
चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.4 एप्रिल) :- मारोडा येथील नागरिक राकेश गंगाधर भुपतवार यांनी गेले दीड वर्षे आजाराचा सामना केल्यानंतर काल रात्रौ दिडच्या सुमारास त्याने शेजारच्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
मारोडा येथे कन्नमवार चौकामध्ये राहणाऱ्या या युवकाने रोजगाराचा साधन शोधून कृषीविषयक रोजगार मिळवला. त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. विवाहानंतर त्याला दोन मुले झाली. त्यात पहिला मुलगा अपंग असल्याने अहोरात्र त्याची काळजी घ्यावी लागत असे. त्याला सुमारे ३९ व्या वर्षी तोंडाचा कर्करोग झाला. हिंमत न हारता त्याने त्यावर शस्त्रक्रिया केली.
या आजारातून मुक्त होण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु त्याला काळाने साथ दिली नाही. या अगोदरच मोठा भाऊ मरण पावला. आईवडील म्हातारे. एक मुलगा अपंग. स्वतः एका मोठ्या आजाराच्या विळख्यात सापडलेला . परिस्थिती पुढे हतबल झाल्याने त्याने रात्रौ घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे..
