बार्टीत जातीचे नव्हे, विकासाचे राजकारण करा

198

✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.4 फेब्रुवारी) :- सध्या राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील अंतर्गत जातीयवाद चव्हाट्यावर आला आहे. बार्टी प्रशासनातील घाण स्वच्छ केली म्हणून आगपाखड करणाऱ्या दलालांनी अधिकाऱ्यांविरुद्ध कट रचण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ५९ जातींमधील एका जातीसाठी ही संस्था काम करते म्हणून इतर जातींमधील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून बार्टीला संपविण्याचा विडा राजकीय धुरिणांनी उचलल्याचे दिसते. त्यामुळे बार्टीला वाचविण्याासाठी समाजातील सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहेत, अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

राज्यात सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. बार्टी या संस्थेची स्थापना २२ डिसेंबर १९७८ रोजी झाली आहे. संस्थेची स्थापना मुख्यतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायाचे, समतेचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झाली होती.

आज बार्टीला ४९ वर्षे झाली आहेत. गेल्या ४५ वर्षांत बार्टी नावाची संस्था असून ती अनुसूचित जातींमधील घटकांच्या विकासासाठी कार्य करते हे फार कमी लोकांना माहिती होते. गेल्या सात ते आठ वर्षांत बार्टीला पाच महासंचालक मिळाले. यातील काही अनुसूचित जातींमधील विविध जातीचे होते. तेव्हा बार्टीतील जातीयवाद मात्र कधीच चव्हाट्यावर आला नाही. कोणताही अनुसूचित जातींमधील इतर जातीचे महासंचालक झाल्यानंतरही बौद्धांनी किंवा आंबेडकरी जनतेंनी आमच्यासोबत जातिवाद केला नाही म्हणून वाद घातला नाही. उलट त्या अधिकाऱ्यांना बौद्धपीठावर बसवून त्यांचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न केला.

गेल्या ४५ वर्षांत बार्टीचा उपयोग फक्त नावापुरता होता.(काही अपवाद वगळता) अनुसूचित जातींमधील ५९ जातींना याचा काडीमात्र लाभ झाला नाही. उलट सर्वांचे नुकसानच झाले. कारण बार्टीसाठी दिवसरात्र योगदान देणारा अधिकारी मिळाला नाही. मात्र, गेल्या दोन वर्षांत बार्टीचे नाव घराघरांमध्ये पोहोचले. असा कोणता कार्यक्रम नाही तिथे बार्टीचे नाव घेतल्या जात नाही. सर्वच ठिकाणी बार्टी संस्थेची स्वतंत्र ओळख झाली आहे. स्पर्धा परीक्षा असो निवासी प्रशिक्षण असो, यामध्ये बार्टीने पुढाकार घेतला आहे. शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांत कधीही चर्चेत नसलेली बार्टी अचानक सर्वांच्या नजरेत भरीत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

एक चांगला अधिकारी एखाद्या संस्थेला उंचीवर पोहोचवू शकतो हे दाखवून दिले. त्यामुळे यापूर्वी महासंचालक म्हणून कार्यभार साधलेल्या अधिकाऱ्यांना आपण हे करू शकलो असतो, याची खंत वाटत असेल, यात शंका नाही. २०२० मध्ये धम्मज्योती गजभिये या अधिकाऱ्याची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी गेल्या अडीच वर्षांत बार्टीचा कायापालट केला. प्रशासनात शिस्त लावली. सर्वांचे सोबत घेण्याचे धोरण राबविले. अनुसूचित जातींमधील सर्व जातींना सोबत घेऊन काम करू लागले. त्यांना सोबत घेणे ही नवीन परिवर्तनाची नांदी होती. त्यांच्या काळात अनेक योजना राबविण्यात आल्या.

सर्व समाजातील लोकांना न्याय आणि लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न श्री. गजभिये यांनी केला. तसेच बार्टीमधील प्रशिक्षणातील निविदा काढण्याचे धोरण पारदर्शक ठरविल्याने त्यांच्याविरोधात कटकारस्थान करण्याचे काम त्यांच्याच कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पकडून सुरू झाले. याकरिता बौद्धेत्तर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना जवळ करण्यात आले. तुमच्या समाजातील लोकांना बार्टीचा काही उपयोग नाही म्हणून दलालांनी सांगणे सुरू केले. आधीच कर्मकांडात आकंठ बुडालेल्या समाजात आगीची ठिणगी पेरण्याचे काम बखुबीने जातीयवादी दलालांनी केले. तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांना सहकार्य केले. बौद्ध आणि बौद्धेत्तर समाज अशा विभागात बार्टीची विभागणी करण्याचे पातक या दलालांनी केले. कारण काय तर गेल्या अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या मलिदा आता मिळणार नाही, याची खात्री झाल्यामुळेच.

दुसरीकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्याही पोटात कालवाकालव झाली, कारण आतापर्यंत बिनबोभाट सुरू असलेल्या कारभारावर अंकुश लावण्याचे काम महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले. त्यामुळे तिन्ही स्तरावरील दलाल दुखावल्या गेले. सर्व दलालांनी एकत्र येऊन लॉबी तयार करण्याचे काम सुरू केले. काही बौद्धेत्तर जातींना एकत्र करून विविध प्रकारे आरोप आणि कट रचण्याचे काम सुरू केले. काहींना विशिष्ट जातीच्या अधिकाऱ्यांना टारगेट करण्यात येत असल्याचा आरोप करून राजकीय संधी साधण्याचा प्रयत्न केला. यातून  

त्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. कोणतीही प्रशासकीय आरोप नसलेल्या व्यक्तीविरुद्ध गेल्या सहा महिन्यापासून कटकारस्थान रचणे सुरू केले. त्याच्या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या मुंबई वाऱ्या सुरू झाल्या. स्वजातीतील नेत्यांच्या भेटी, मंत्र्याच्या भेटी घेणे सुरू झाले. या पदावर बसविण्यासाठी समाजातील अधिकाऱ्यांची शोधही घेणे सुरू झाले. गेल्या सहा महिन्यांपासून शिजत असलेल्या कटाची अंमलबजावणी २३ जानेवारी २०२३ झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीपणे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना पदमुक्त करण्यात आले.

दुसरीकडे त्यांना कोणत्याही खात्यात सामावून घेतले नाही. पदमुक्तीला ९ महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अचानक हा प्रकार घडल्याने सर्वांना जबर धक्का बसला. यामुळे सर्वस्तरातून याचा निषेध करण्यात आला. शेवटी श्री. गजभिये यांनी मॅटमध्ये जाऊन अन्यायविरोधात दाद मागितली. त्यांच्या पदमुक्तीला स्थगिती देण्यात आली. हा प्रशासकीय खेळ झाला.

बार्टीचे अस्तित्व धोक्यात

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देताना अनुसूचित जाती ही वर्गवारी केली. त्यांनी कोणत्याही जातीचा भेदभाव न करता शेकडो जातींना या प्रवर्गात एकत्र गुंफले. कारण काय तर या प्रवर्गातील सर्व जातींनी एकत्र येऊन त्यांनी आपल्या हक्काविरुद्ध लढा द्यावा, असा त्यांचा हेतू होता.

त्यामुळे महाराष्ट्रात ५९ जाती अनुसूचित जातीमध्ये आहेत. यातील पूर्वाश्रमीचा महार आणि आत्ताचे बौद्ध यांनी डॉ.बाबासाहेबांच्या शिकवणीवर विश्वास ठेवला. शिक्षणाला महत्त्व देऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांचा विकास झाला. मात्र, इतर जाती कर्मकांड बुडाल्यामुळे आणि शिक्षणाला फारसे महत्त्व न दिल्यामुळे त्यांच्या विकासाला खिळ बसली. आता त्यांच्यामधील शिक्षणाचे प्रमाण वाढू लागले.

बार्टीसारखी संस्था त्यांना उच्च शिक्षण देऊ लागली. मात्र, त्यांच्या विषाची पेरणी करण्याचे काम त्यांच्यातीलच काही अधिकारीवर्ग आणि संघटनांनी सुरू केले. लहान भाऊ, मोठा भाऊ अशी वर्गवारी करून त्यांच्यात फूट पाडण्याचे काम केले. त्यामुळे चळवळीतील दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू केले. फक्त बौद्धांमध्ये झालेल्या प्रगतीचा द्वेष करून या विषाची पेरणी केली. त्यात यशही मिळत आहे. मात्र, आपल्यासाठी चांगले काम करणाऱ्याला बदनाम करीत आहोत याचे भानही त्यांना नाही.

महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्यापूर्वी आलेल्या महासंचालकांना जाब विचारण्याची तसदी मात्र, त्या संघटनांनी घेतली नाही. गेल्या ४५ वर्षांत समाजातील संघटनांनी जाब विचारला असता तर प्रत्येक समाजात मोठे अधिकारी निर्माण झाले असते. पण, त्यांनी जाब विचारला नाही. आता ते जाब विचारीत आहेत. जाब विचारणे वाईट नाही. काही ऐकीव गोष्टींवर आणि राजकीय दलालांचे खेळणे बनून चांगल्या अधिकाऱ्यांना बदनाम करून त्यांना पदावरून दूर करण्याचा अट्टहास कशासाठी, याचे उत्तर फक्त आजही आपण कोणाचे तरी गुलाम आहोत.

गुलामांना आपल्या विकासाची जाणीव नसते. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास दिला जाते. कोणताही अधिकारी हा त्या पदावर आयुष्यभर चिकटून राहत नाही. तशी प्रशासनात सोयपण नाही. तीन वर्षात आणि सरकारची मर्जी असेपर्यंत तो अधिकारी त्या पदावर राहतो. अशावेळी त्यांच्यावर घाणेरडे आणि त्यांचे प्रशासकीय करिअर बरबाद करणारे आरोप कशासाठी करायचे? हा साधा प्रश्नही राजकीय गुलामांना पडला नाही. एकदा काय चांगल्या कामाची आखणी झाली की कोणताही अधिकारी विकास करतो. चांगले काम करतो.

गेल्या ४७ वर्षांत महासंचालक पदावरील अधिकाऱ्यांना काय केले याचा जाब राजकीय गुलामांनी सरकारला विचारायला पाहिजे. कारण दोन वर्षांत समाजाचे नुकसान झाले. बौद्धांनी आपल्या योजना खाल्ल्या म्हणण्याचा नैतिक अधिकार तरी त्या राजकीय गुलाम आणि दलालांना नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे काम सुरू होणार आहे. राजकीय दलालांच्या आमिषाला बळी न पडता अनुसूचित जातींमधील प्रत्येक घटकाला कसा लाभ देता येईल याचे नियोजन केले पाहिजे. सरकार अनेक संस्था सुरू करेल.

पण त्या संस्था टिकतील काय, हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे. सध्या अनेक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. मात्र, सामाजिक बांधिलकी नसलेले अधिकारी मिळत नसल्याने त्या संस्थांचे प्राथमिक स्तरावरील काम सुद्धा सुरू झाले नाही. तर बार्टीला प्रकाश झोतात येण्यासाठी जवळपास ४७ वर्षे लागली, याची जाणीव अनुसूचित जातींमधील प्रत्येक घटकाने ध्यानात ठेवावी. बार्टी ही उद्याचा प्रकाश देणारी सामाजिक संस्था आहे.

त्यात कोणत्याही प्रकारचे जातीय राजकारणाचा शिरकाव करू नका. कारण बार्टी बंद पडल्यावर एका विशिष्ट जातीपुरती नव्याने सुरू केलेली संस्था सुरूच राहील याची खात्री नाही. त्यामुळे बार्टी बंद करण्याचा घाट करू नये, कारण ही बंद पडली तर तेलही गेले आणि तुपही गेले, अन् हाती आले धुपाटणे अशी अवस्था अनुसूचित जातींमधील सर्व घटकांची होऊ नये. 

सुरेश डांगे, संपादक, साप्ताहिक-पुरोगामी संदेश, मो.8605592830