✒️भद्रावती(Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.21 ऑगस्ट) :- बियाण्यांसह रासायनिक खते, औषधे यांच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि त्यामानाने हमीभावामध्ये होणारी अत्यल्प वाढ ही बाब शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर गंभीर परिणाम करणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीकडे कल वाढताना दिसत असून, त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना कमी खर्चात कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय म्हणून दशपर्णी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिक कृषी कन्यांनी दिले.
महारोगी सेवा समिती द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन वरोरा यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेगांव (खुर्द)(ता.भद्रावती ) या गावात कृषी कन्यांनी विशेष उपक्रम राबविला.
याउपक्रमात या कार्यक्रमात कृषीदुत वैभव शेडामे, आदर्श पांडेय, पंकज घुगुस्कर, करण बघेले, सौरभ भांडेकर. तेजस गाडेकर, हर्षल आत्राम यांचा सहभाग होता यांनी शेतकऱ्यांसमोर प्रात्यक्षिकासह दशपर्णी अर्क तयार करून दाखवले. दशपर्णी अर्क म्हणजे दहा प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचे मिश्रण. यामध्ये येरंडी, रुई, कडुनिंब, करंज, घाणेरी, कान्हेर, पपई, सीताफळ, निंब (नीम) आणि निलगिरी या झाडांची पाने वापरली जातात.
यामध्ये ५ लिटर गोमूत्र व ५ लिटर पाणी एकत्र करून त्यात ही सर्व पाने टाकून तयार केलेले द्रावण ४५ दिवस बंद ड्रममध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे द्रावण गाळून फवारणीसाठी वापरले जाते. या अर्काचा वापर भाजीपाला, फळबाग व इतर पिकांवरील कीटक नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी ठरतो, शिवाय उत्पादन खर्चात मोठी बचत होते, असे कृषी दुतांनी शेतकऱ्यांना समजावले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन, समन्वयक डॉ. राहुल तायडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अश्विनी मानकर आणि विषयतज्ज्ञ डॉ. विठ्ठल पाटील यांनी केले.
दशपर्णी अर्क सारख्या सेंद्रिय पर्यायांचा प्रचार व प्रसार केल्यास शाश्वत आणि आरोग्यदायी शेतीकडे शेतकऱ्यांचा अधिक झुकाव होणार, अशी आशा या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली.







