महालगावात कृषीदूतांकडून पारंपरिक बियाण्यांचे संकलन; महिलांनी जपले जुने वाण

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.3 जून) :-

येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्राचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत महालगाव येथे विविध सामाजिक आणि कृषी उपक्रम राबवीत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कृषीदूत नयन खोब्रागडे, संदीप जाटवे, अमन कार्लेकर, वैभव काळे आणि ओम जाधव यांनी गावात ‘जर्मप्लाझम संकलन’ (Germplasm Collection) मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी महालगाव येथील महिलांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडे वर्षानुवर्षांपासून जपून ठेवलेले पारंपरिक बियाणे गोळा केले. यामध्ये प्रामुख्याने तीळ, वाल, टोमॅटो, भेंडी, धने (धना) आणि चवळी या पिकांच्या जुन्या, गावरान आणि पारंपरिक वाणांचे (Seeds) यशस्वी संकलन करण्यात आले. आजच्या रासायनिक आणि संकरित (Hybrid) बियाण्यांच्या युगात या जुन्या, रोगप्रतिकारक आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या गावरान बियाण्यांचे जतन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना दिली.

गावातील महिलांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवून आपापल्या घरातील पारंपरिक बियाणे कृषीदूतांकडे सुपूर्द केले. विद्यार्थ्यांच्या या जैवविविधता जतन करण्याच्या ‘सोशल ऍक्टिव्हिटी’चे गावतील महिला बचत गट अध्यक्ष सौ. मनिषा पुस्नाके, सौ. सुनीता माकोडे आणि इतर महिला यांनी भरभरून सहभागी दर्शविला आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.