✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.2 जून) :-मा.सौ.सुनीता रघुनाथ आत्राम व गावचे पोलिस पाटील मा. श्री प्रविण मढवी: ग्रामीण भागातील शेती, शेतकरी जीवन आणि कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथील अंतिम वर्ष बी.एस्सी. (कृषी) विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत पिजदुरा गावात आगमन झाले. विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ, शेतकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुढील काही आठवडे गावात राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. तसेच शेतीतील विविध पिकांची स्थिती, कृषी समस्या, शासकीय योजना, पशुपालन, जलव्यवस्थापन आणि कृषीपूरक उद्योगांचा अभ्यास करणार आहेत. यासोबतच शेतकरी मेळावे, कृषी जनजागृती कार्यक्रम, प्रात्यक्षिके आणि सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाशी जुळवून घेत शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले. रावे प्रमुख डॉ. आर. व्ही. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत असून कार्यक्रम समन्वयक आर. व्ही. तायडे हे विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे नियोजन करीत आहेत.
विद्यार्थी ओम बोरे, वंश बांते, सोहम चंदनखेडे, वैभव बघे आणि मुंजाभाऊ मसलकर यांच्या उपस्थितीमुळे गावात कृषीविषयक जनजागृती वाढण्यास मदत होणार असून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास हातभार लागणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
रावे कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, शेती व्यवस्थापन आणि कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून शेतकरी आणि कृषी विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.







