घर बांधून मिळण्यासाठी महिलेचे आमरण उपोषण

🔹प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी आमच्याच राहत्या घरावर बुलडोझर का चालविला

🔸न्यायालयाचे आदेश झुगारत नगरपंचायत प्रशासनाने आमचेच घर का पाडले ? त्यांना इतर अतिक्रमण का काढण्यात येत नाही महिलेचा प्रश्न

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव(दि .12 ऑगस्ट) :- येथील वार्ड क्र.1 मधील सुमनबाई मंगल पवार रहिवासी असून या ठिकाणी त्यांचे घर आहे. घराच्या जागेवर दोन खोल्यांचे बांधकाम करून मागील पस्तीस वर्षापासून कुटुंबीयसह वास्तव्यास आहेत. महागाव नगरपंचायत द्वारे आमचे राहते घर पाडून आम्हाला रस्त्यावर आनले असल्याने प्रशासनाने घर बांधून द्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून महिलेने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला.

एक ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात उपोषणकर्त्या महिला सुमनबाई मंगल पवार यांनी म्हटले आहे की, आम्ही वास्तव्यात असणाऱ्या घरी वीज वितरण विभागाकडून लाईन मीटर कनेक्शन सुद्धा मिळाले.

नगरपंचायत महागाव यांनी माझे घराचे बांधकाम अतिक्रमणाच्या जागेवर आहे म्हणून काढून घ्यावे अशी 14 जुलै रोजी नोटीस दिली होती. नगरपंचायत महागाव यांनी दिलेल्या नोटीसी विरोधात माझ्या पतीने विद्यमान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर महागाव यांचे न्यायालयात दिवाणी मुद्दा नंबर 60/2025 नुसार विनंती अर्ज दाखल केला होता. सदर दाव्यामध्ये न्यायालयाने माझ्या राहत्या घराचे बांधकाम पाडू नये, आहे त्या स्थितीमध्ये बांधकाम ठेवावे असा जैसेथेचा आदेश दिला होता. तो आदेश अँड. सुदर्शन देशमुख यांनी प्रभारी मुख्याधिकारी महेशकुमार जामनोर यांच्या व्हाट्सअप वर पाठविला होता.

प्रभारी मुख्याधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून माझे घर पाडले. वास्तविक पाहता नगरपंचायत महागाव यांनी संपूर्ण रस्त्याचे अतिक्रमण काढायला पाहिजे ? परंतु केवळ लक्ष्मीबाई पवार व माझेच घर जाणीवपूर्वक काढून आम्हा गरिबावर अन्याय केला आहे. त्यामुळे माझे कुटुंबीय रस्त्यावर आले. आम्हाला मजबुरीने शेजाऱ्याच्या घरी जाऊन राहावे लागत आहे. माझे पती अर्धांगवायू या बिमारीने ग्रस्त आहेत. ते कुठेही काम करू शकत नाहीत.

मला या जागे शिवाय राहण्यास दुसरे कुठेही इतरत्र घर नाही. मला राहण्याकरिता त्या जागेवर घराचे बांधकाम करून घ्यावे किंवा इतर पर्यायी ठिकाणी कुठेही घर बांधून द्यावे. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत कुटुंबासह अमरण उपोषण करणार असल्याचे 1 ऑगस्ट 2025 रोजी महागाव पोलीस स्टेशनला सुचित केले.त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या समोर 12 ऑगस्ट मंगळवार पासून महिलेने आमरण उपोषणाला प्रारंभ केला.