अखेर शेतकऱ्यांच्या एकजुटीने दप्तरी ऍग्रो सीड्सला नमावे लागले

🔹दप्तरी ऍग्रो सीडच्या हेकेखोरी धोरणाने चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीच्या ऑफिसवर घेराव घातल्याने काल सोमवारी दप्तरी ऍग्रो कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने शेतकऱ्यांतून होत आहे समाधान व्यक्त 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी) 

महागाव (दि.12 ऑगस्ट) :- तालुक्यातील माळकिन्ही येथील शेकडो एकरवर दप्तरी सीड्स ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेलु वर्धा या कंपनीचे कपाशीचे सीड्स लावले होते. परंतु मध्येच कपाशीचे सीड उपटुन टाका असे कंपनीच्या एजंट द्वारे शेतकऱ्यांना सांगितल्या गेल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला होता. या संदर्भात कंपनीद्वारे होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 8 ऑगस्ट रोजी विदर्भ प्रतिष्ठान न्यूज नेटवर्क द्वारे वृत्त प्रसिद्ध झाले. दप्तरी ऍग्रो सीड्स कंपनीला शेतकऱ्यांच्या मागण्या अखेर मान्य कराव्या लागल्या. 

मागील काही वर्षापासून तालुक्यातील माळकिन्ही, गुंज येथील शेतकऱ्यांनी दप्तरी कपाशी सीड घेतले आहे. कंपनीने आज पावतो शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन केले होते, परंतु अचानक दीड ते दोन महिने झाल्यानंतर कंपनीच्या एजंट कडून शेतातील सीड्स उपटून टाकण्याचे सांगण्यात आल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला होता. सदर सीड्स प्लॉटला 70 ते 80 टक्के खर्चही झाला होता.

पुढील दीड महिन्यामध्ये सीड कापूस शेतकऱ्यांच्या घरात येणार असल्याने मध्येच सीड्स कंपनीकडून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या खाईत ढकलल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गुंज, माळकिन्ही परिसरातील शेतकऱ्यांनी संघटित होत दप्तरी ऍग्रो सीड्स प्रा .ली. कंपनी वर्धा शेलु येथील त्यांच्या ऑफिसवर सोमवारी घेराव घातला होता. या वेळी शेतकऱ्यांनी सिड्स कंपनीद्वारे कापूस पंचवीस हजार रुपये भावाने खरेदी केला जाईल अशा पद्धतीचे एग्रीमेंट कंपनीकडून लिहून घेण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांना सीड्स उपटायचे आहेत त्यांना एका पॅकेटला 28 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे कंपनीकडून कबूल करवुन घेण्यात आले. ज्यांना सीड्स काढून दुसरे उत्पादन घ्यायचे नाहीत अशांना नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर 56 हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्या मुळे शेतकऱ्यांनी संघटित होत 11 ऑगस्ट रोजी केलेल्या उठावाच्या मागणीचा विजय झाला.

या वेळी उमरखेड- महागाव मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नामदेवराव ससाने, प्रहारचे जिल्हाप्रमुख बिपिन चौधरी, डॉ. अरुण पाटील, लखन राठोड, उत्तम चिंचोळकर, लखन राठोड, शिवाजी कानडे, प्रकाश चव्हाण, अर्जुन कानडे, साईराम काळे, गजानन मते, राहुल खंदारे, नामदेव खंदारे, आझादभाई यांचे सह राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रमोद जाधव यांनी अनेक शेतकऱ्यांसह कंपनीच्या कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या.

8 ऑगस्ट रोजी विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क द्वारे शेतकऱ्यांच्या न्याय मागणीची दखल घेतल्याने अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने शेतकरी एकजुटीचा विजय झाला असल्याने राष्ट्रीय किसान संघटनेचे प्रमोद जाधव यांनी शेतकऱ्याच्या वतीने विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्कचे धन्यवाद मानले.