महागाव दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल सप्ताह 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)

महागाव(दि.4 ऑगस्ट) :- महसूल सप्ताहानिमित्त नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यात, सलोखा, ई-रजिस्ट्रेशन, विवाह नोंदणी आणि महिला खरेदीसह शैक्षणिक कर्जात सवलतीच्या उपक्रमाचा लाभ दिला जाणार आहे. सह जिल्हा निबंधक यवतमाळ बाळासाहेब घोंगडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. 

      महागाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात देखील महसूल सप्ताह राबविला जात असून या महसूल सप्ताह निमित्त नोंदणी व मुद्रांक विभागातील शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. सलोखा योजनेत शासनाच्या शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील वाद मिटविणे व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमध्ये सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी, शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तऐवज यासाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये व नोंदणी फी नाममात्र एक हजार रुपये आकारण्यात येतात. या सलोखा योजनेमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुद्रांकशुल्क व नोंदणी फी यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. २०२३ मध्ये सुरू केलेली सलोखा योजनेचा कालावधी सन २०२७ पर्यंत वाढवण्यात आली असुन याचा लाभ घेण्याचे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागाकडून करण्यात आले आहे. 

     ई-रजिस्ट्रेशन योजनेत नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधकाम व्यावसायिक यांना आणि खरेदीदार यांच्यातील प्रथम विक्रीचा करार व इतर नोंदणी यासाठी ऑनलाइन ई-रजिस्ट्रेशन प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी ई-रजिस्टेशन सेल्फ पोर्टल विकसित केले असून, पोर्टलच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायिकांना या सुविधेत स्वतःचे टेम्पलेट तयार करणे, त्यांची ऑनलाइन पडताळणी करणे व दस्तऐवज तयार करून त्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ही सुविधा www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन या सदराखाली e-registration या ठिकाणी उपलब्ध आहे. महागाव येथे दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल सप्ताह राबविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाळासाहेब घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह दुय्यम निबंधक गजानन घंदारे, कनिष्ठ लिपिक दत्तकुमार कलेटवाड यांनी परिश्रम घेतले.