✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.20 फेब्रुवारी) :-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिमूर यांच्या वतीने भव्य शिवशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ऐतिहासिक झाक्यांनी आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शहर शिवमय झाले.
कार्यक्रमाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. अश्विन अगडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी मुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे, परमानंद बोरकर, माजी विद्यार्थी श्रीहरी सातपुते, भारती गोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अफझलखान वध, रायगड राज्याभिषेक, गड-किल्ल्यांची उभारणी यांसारखे शिवकालीन प्रसंग जिवंत साकारले. मावळ्यांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात शहरातून मार्गक्रमण केले.
शोभायात्रा नेहरू चौक, डॉ. अब्दुल कलाम चौक, गुरुदेव किराणा चौक, संताजी जगनाडे महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. व्यापारी संघटनेतर्फे अल्पोपहाराची तर माजी विद्यार्थ्यांकडून पाणी व मिठाईची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोपटे मॅडम, उमरे मॅडम, वागदरे सर, दांडेकर सर, गोमासे सर, गौरकर सर, चौधरी सर, सहारे सर, मेश्राम सर, शेंडे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
नेहरू विद्यालयाच्या या शिवशोभायात्रेने चिमूर नगरीत शिवभक्तीचा आणि राष्ट्राभिमानाचा जाज्वल्य संदेश दिला.







