🔹लोकशाही की लपंडाव? मतदारच संभ्रमात
✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.29 जानेवारी) :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नुकतीच पार पडलेली निवडणूक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून, ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव की संशयाचा महोत्सव? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच मतदार यादी, अर्ज छाननी, चिन्ह वाटप आणि मतदान प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर संशयाचे ढग दाटलेले दिसून येत आहेत. काही उमेदवारांनी तर “सगळं आधीच ठरलेलं होतं, आम्ही फक्त शोभेची बाहुली” अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी मतदारांना “आमचं नाव यादीत आहे की नाही, हे शोधण्यातच अर्धा दिवस गेला” तर काहींना “मतदान केंद्रावर पोहोचल्यावर कळलं की आमचं मतदान आधीच झालंय!” असा अनुभव आल्याची कुजबुज आहे.
प्रशासनाकडून मात्र नेहमीप्रमाणे “सगळं नियमाप्रमाणे पार पडलं” असा खुलासा देण्यात आला असला तरी, नागरिक मात्र या खुलाशावर समाधानी नसून
“नियम कोणते आणि कोणासाठी?” असा प्रश्न आता खुलेआम विचारला जात आहे.
एकीकडे बँक लोकांची, दुसरीकडे निर्णय काही मोजक्यांचेच, अशी अवस्था झाली असून, ही निवडणूक म्हणजे ‘सहकाराची’ नव्हे तर ‘संशयाची सहकारी’ निवडणूक ठरते की काय? अशी चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे.
सध्या तरी या निवडणुकीत जिंकले कोण, यापेक्षा
निवडणूक खरंच झाली का? हाच प्रश्न जास्त गाजतोय.







