आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा रावे कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात सहभाग

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.2 जून) :-ग्रामीण जीवन, शेती व्यवस्थापन आणि कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा येथील अंतिम वर्ष कृषी स्नातक पदवीच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रम उत्साहात सुरू झाला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध गावांमध्ये भेट देत ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास प्रारंभ केला.

वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारोती येथे आगमन होताच ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. येत्या काही आठवड्यांत विद्यार्थी गावामध्ये राहून शेती पद्धती, पिकांची सद्यस्थिती, कीड व रोग व्यवस्थापन, पशुपालन, सेंद्रिय शेती तसेच कृषीपूरक व्यवसायांचा अभ्यास करणार आहेत.

तसेच यासोबतच शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, कृषी जनजागृती मोहीम, प्रात्यक्षिके, मृदा परीक्षण, शासकीय कृषी योजनांची माहिती आणि विविध सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान व प्रामुख्याने नवनवीन शेती पद्धती, नैसर्गिक शेती संकल्पना, शेतीचे यांत्रिकीकरण, शून्य मशागत (No-Till Farming) इत्यादी.. आणि सरकारच्या शेतीविषयक धोरणांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाशी आत्मीयतेने जोडले जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून सोबतच स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करण्याची जबाबदारी दिली आहे. रावे कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून कार्यक्रम समन्वयक आर. व्ही. तायडे विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत.

महाविद्यालयाचे विद्यार्थी मोहित राऊत, अभिषेक खारकर, कृष्णा निकम, ओम पाठक आणि अथर्व निखारे यांची गावामध्ये कृषीदत म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या सहभागामुळे निश्चितच गावामध्ये कृषीविषयक जागरूकता वाढण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि शासकीय योजनांची माहिती मिळण्यास हातभार लागणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.