✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.4 जानेवारी) :-
दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी चिमूर शहरात घडलेल्या युवकाच्या खुनाच्या घटनेचा अवघ्या तीन तासांत छडा लावत चिमूर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
याबाबत फिर्यादी श्रीमती उषा प्रभाकर उताने (वय ५०, रा. तनिस कॉलनी, ठक्कर वार्ड, चिमूर) यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने (वय ३१) हा नेहरू विद्यालय परिसरात डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याने जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात अप.क्र. ०२/२०२६, कलम १०३(१) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळाची पाहणी केली असता, दारूच्या नशेत झालेल्या शिवीगाळातून वाद निर्माण होऊन झटापटीदरम्यान आरोपींनी आकाश उताने याचा खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने अवघ्या तीन तासांत सुजल विलास सोनवाने (वय २०), रा. नेताजी वार्ड, चिमूर. छगण मोहन दिगोरे (वय २७), रा. नेताजी वार्ड, चिमूर. अनिकेत शेषराव साखरकर (वय २४), रा. नेताजी वार्ड, चिमूर या आरोपींना ताब्यात घेतले आहे
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







