एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी — माळी समाजाचा पुढाकार

✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.3 जानेवारी) :- 

पळसगाव (पि.) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पळसगाव येथे शुक्रवार (दिनांक २ जाने.) रोजी सकाळी ८ वाजता पासून माळी समाजाच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. स्वच्छ गाव – सुंदर गाव हा संदेश घेऊन सकाळपासूनच महिलां-पुरुषांनी झाडू, टोपल्या, फावडे हातात घेत गावातील गल्लीबोळ, प्रमुख रस्ते, समाज मंदिर परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांची कसून स्वच्छता केली.

या उपक्रमात साचलेला कचरा वेचून त्याची विल्हेवाट लावणे, साफसफाई, रस्त्यांच्या कडेला झुडपे कापणे, तसेच नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरुक करण्यासाठी आवाहन करण्यात आले. घरासमोरचा कचरा आपलाच,स्वच्छता सर्वांची असा संदेश देत कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

स्वच्छता मोहिमेच्या नेतृत्वात अखिल माळी समाजाचे अध्यक्ष वासुदेव मांदाळे, सचिव शंकर वाटगुरे, महिला अध्यक्ष गीता शेंडे, सचिव लता चौधरी, जेष्ठ सदस्य उद्धव गुरनुले यांच्यासह युवक व महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग होता. उपक्रमादरम्यान समाजातील ज्येष्ठांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत शिक्षण, समता आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.

स्वच्छता हीच सेवा या भावनेतून राबविलेल्या उपक्रमाला ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला. गाव स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही नागरिकांतून व्यक्त झाली.