गुणांच्या पलीकडे जीवन घडतं!” – सतिश मेश्राम यांचा विद्यार्थ्यांना जाज्वल्य संदेश

🔸संगम २०२५–२०२६ | नेहरू विद्यालय व उच्च महाविद्यालय, चिमूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात

 ✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.2 जानेवारी) : – नेहरू विद्यालय व उच्च महाविद्यालय, चिमूर येथे संगम २०२५–२०२६ या नावाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या भव्य पटांगणात अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निशिकांत मेहरकुरे हे होते. तर सतिश मेश्राम यांनी प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना जाज्वल्य व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध, प्रभावी व नेटके संचालन अभिलाष गोमासे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी किरण उमरे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

   २९ डिसेंबर ते ३० डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत चातुर्य दाखविले. दिनांक ३१ डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन. कलाप्रदर्शन. व बौद्धिक स्पर्धा संपन्न झाल्या. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा, गीत, एकांकिका, देशभक्तीपर कार्यक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे नाट्यप्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणास उपस्थितांकडून भरभरून दाद देण्यात आली.

“गुणांच्या पलीकडे जीवन घडतं!” – सतिश मेश्राम

प्रमुख वक्ते सतिश मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत गुण मिळवणे नाही, तर व्यक्तिमत्त्व, विचार आणि जीवन घडविण्याची प्रक्रिया आहे.” आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव जोपासणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मोबाईल व सोशल मीडिया हे ज्ञानवृद्धीचे प्रभावी साधन ठरू शकतात; मात्र त्यांचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक प्रगतीस बाधक ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा समतोल, सकारात्मक आणि हेतुपूर्ण वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

अपयशाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “अपयश हा शेवट नसून यशाकडे नेणारी पहिली पायरी आहे.” अपयशातून धडा घेऊन पुन्हा प्रयत्न करणारे विद्यार्थीच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

अध्यक्षीय मनोगत

अध्यक्ष निशिकांत मेहरकुरे यांनी अध्यक्षीय भाषणात नेहरू विद्यालय व उच्च महाविद्यालय, चिमूर येथील उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच शाळेची गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.