दिव्यांग व बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांसोबत शिवकल्याण संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत केले नवीन वर्षाचे स्वागत

🔸समाजातील दुर्बल, दिव्यांग व बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांसाठी राबविले जाणारे उपक्रम हीच खरी सामाजिक बांधिलकी…अनुप कोहळे

✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली (दि.3 जानेवारी) :- 

“दीन-दुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या संतवचनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत, शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन, गडचिरोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत निवासी कौशल्या मतिमंद विद्यालय, बोदली, ता. जि. गडचिरोली येथील दिव्यांग व बौद्धिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांसोबत नवीन वर्ष साजरे करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांच्यासोबत विविध खेळ, मनोरंजनात्मक स्पर्धा व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. तसेच शिवकल्याण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

नवीन वर्षाचे स्वागत केवळ औपचारिक आनंदोत्सवापुरते मर्यादित न ठेवता, दरवर्षी समाजोपयोगी व संवेदनशील उपक्रमांच्या माध्यमातूनच नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा शिवकल्याण संस्थेने जोपासली आहे. समाजातील दुर्बल, दिव्यांग, बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुले तसेच उपेक्षित घटकांसाठी राबविले जाणारे उपक्रम हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे मत संस्थाध्यक्ष अनुप कोहळे यांनी यावेळी व्यक्त केले.

बौद्धिकदृष्ट्या अक्षम विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार विविध खेळ व स्पर्धांसाठी तयार करून, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे प्रेरणादायी कार्य विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री. चिल्ललवार सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांकडून अत्यंत समर्पणाने केले जात असून, हे कार्य समाजासाठी आदर्शवत असल्याचेही अनुप कोहळे यांनी नमूद केले.

यावेळी शिवकल्याण संस्थाध्यक्ष अनुप कोहळे, विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत जोशी सर, शिवकल्याण संस्था सहसचिव तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा युवती प्रमुख संतोषी सूत्रपवार, संस्थेचे सदस्य चंचल रोहनकर, मिथुन बाबनवाडे, जावेद खान, मुकेश कोहळे, विकास मादेसवार, शुभम किरमें, कृतिका काठवले, देशमुख सर, मोहिते मॅडम, भोमले सर, सुरुषे सर, आटे सर, जयपूरकर सर, सूर्यवंशी बनपूरकर सर तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.