🔸जिल्हाधिकाऱ्यांसमोर अविश्वास ठराव मंजूर
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.15 डिसेंबर) :-
१५ डिसेंबर २०२५ रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला असून सभापती गुलाब लोभा जाधव (भाजप) यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील १६ संचालक (काँग्रेस–राष्ट्रवादी गट) यांनी गुलाब लोभा जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सुनावणी अंती सदर ठराव मंजूर झाल्याने बाजार समितीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.
शेअर्स वसुलीत घोटाळ्याचा आरोप
गुलाब लोभा जाधव यांच्या कार्यकाळात बाजार समितीतील शेअर्स वसुलीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आरोप संचालकां कडून करण्यात आले होते. प्रत्यक्षात मोठी रक्कम वसूल करूनही रेकॉर्डमध्ये कमी रक्कम दाखवण्यात आल्याने भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
या प्रकरणी सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी चौकशी सुरू केली असता, समितीतील काही कर्मचाऱ्यांनी टाळाटाळची भूमिका (टाईप भूमिका) घेतल्याचा आरोप आहे. व्यापाऱ्यांन कडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असतांनाही कच्च्या चिठ्ठीत शेअर्स जमा न दाखवणे, तसेच पक्क्या पावत्या न देणे असे गंभीर प्रकार उघडकीस आले होते.
वृत्तपत्रातील सातत्यपूर्ण बातम्यांचा परिणाम
शेअर्स घोटाळ्या बाबतची माहिती वारंवार वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे तसेच संचालकांचा दबाव वाढल्याने अखेर अविश्वास ठरावाची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर पोहोचली. विशेष बाब म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी व आमदारांचा पाठिंबा असूनही गुलाब लोभा जाधव यांना सभापती पद गमवावे लागले हे विशेष..!
राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ
जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरच अविश्वास ठराव मंजूर झाल्याने हा निर्णय प्रशासनाची ठाम भूमिका दर्शवणारा मानला जात असून महागाव तालुक्याच्या राजकारणात या मुळे मोठी चर्चा सुरू आहे. पुढील काळात बाजार समितीतील शेअर्स घोटाळ्याच्या चौकशीला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.







