कृषी उत्पन्न बाजार समितीपुढे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

🔸कृषी उत्पन्न बाजार समिती लुटीचे केंद्र राष्ट्रीय किसान मोर्चाचा आरोप 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.15 डिसेंबर) :- 

    केंद्र सरकारने ठरवलेल्या आधारभूत किंमतीमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हळद व इतर पिकांची खरेदी करण्यात यावी. आधारभूत किंमती पेक्षा कमी दरामध्ये शेती मालाची खरेदी होत असेल तर अशा व्यापाऱ्यांवर किंवा खाजगी केंद्रावरती कृषी उत्पन बाजार समितीने कार्यवाही करावी, या मागण्या साठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने 15 डिसेंबर रोजी महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

        शेतमालाच्या पणनसाठीची प्राथमिक जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समिती,जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन महामंडळ या तीन स्तरावर घेतली जाणे गरजेचे होते. परंतु मागील सात दशकांपासून या तिन्ही पातळी वर शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष झाल्याची टीका निवेदनातून करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळणे हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रात कोणताही शेती माल निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी होऊ नये, यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 नियम 32 ( घ ) लागू असतांना सुद्धा व्यापाऱ्या कडून सर्रास शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या अधिकाराचा योग्य तो वापर करावा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये शेतकऱ्यांच्या मालाची आधारभूत किंमती मध्ये खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे.

सरकारने भावांतर योजना लागू करावी. तसेच सन 2021 ते 2025 -26 या हंगामा पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीने हमी भावात खरीदी केलेल्या शेतीमालाचा तपशील व आधारभूत किंमती पेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापारावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मिळण्यासाठी निवेदना द्वारे मागणी करण्यात आली. या विरोधात राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात चरणबद्ध आंदोलनातील दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रमोद जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष चक्रधर देवसरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनिष जाधव, विद्वान केवटे, गोविंदराव देशमुख (सवनेकर), पंजाबराव गावंडे, काळे, देवराव पाईकराव, देविदास कदम, प्रमोद देशमुख, शे.सलिम, विनोद बनसोडे, रमेश कांबळे, तानाजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव, तुकाराम सोयाम, निरंजन तडस, भगवान खंदारे यांचे सह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.