✒️ महेंद्र लटारे चंद्रपूर (chandrapur प्रतिनिधी)
चंद्रपूर (दि.6 जानेवारी) :-
घुगुस (जि. चंद्रपूर) येथील औद्योगिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध, कार्यतत्पर आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असणारे मा. अशोक रामटेके यांची वाईस इंडिजीअस पिपल फॉर जस्टिस अँड पिस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थीदशेपासूनच त्यांना सामाजिक व सांस्कृतिक कार्याची प्रखर आवड असून, मागील दोन दशकांपासून त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये निस्वार्थ भावनेने, प्रामाणिकपणे आणि जिद्दीने कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचा व्यापक विस्तार जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरही होत असून, विशेषतः मानवाधिकार विषयक तक्रारी आणि प्रकरणे जिल्हाधिकारी तथा विभागीय स्तरावर प्रभावीपणे मांडण्याच्या त्यांच्या भूमिकेची दखल घेण्यात आली आहे.
फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित, कर्तव्यदक्ष व शिलवान अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल विचार करून, संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. एस. के. गजभिये, राष्ट्रीय सचिव अॅड. किशोर कांबळे (हायकोर्ट, मुंबई), अॅड. दुबे (पुणे), श्री. रजनीस साहेब, डॉ. प्राध्यापक धम्मदिप गजभिये आदी मान्यवर तसेच राज्य समन्वयक डॉ. नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
रामटेके यांच्या सुयोग्य नियुक्तीबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या हातून भविष्यातही विधायक, प्रामाणिक आणि परिणामकारक सामाजिक कार्य घडो, अशा मंगलमय शुभेच्छा विविध स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत.







