गांधी वॉर्डातील वीज पोल धोकादायक; अपघाताची भीती, तात्काळ दुरुस्तीची मागणी

🔹गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर (दि.6 जानेवारी) :-

       चिमूर शहरातील गांधी वॉर्ड, प्रभाग क्रमांक ८ येथील बंडे आटा चक्की जवळील वीज पोल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोल क्रमांक 286 हा खालून पूर्णपणे झिजलेला असून हलत आहे, तर पोल क्रमांक 287 हा रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झुकलेला आहे.

या दोन्ही पोलांवरील विद्युत वाहिन्या सैल झाल्याने कोणत्याही क्षणी पोल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर परिसर हा दुहेरी बाजूंनी रहदारीचा असून येथे नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे पोल पडल्यास मोठी जिवितहानी होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

         स्थानिक नागरिकांनी याबाबत महावितरण विभागाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन वीज पोलांची पाहणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नंदू सहारे. श्रीहरी सातपुते. योगेश अगडे. विलास मोहिनकर. करण सहारे. अजय नागोसे. शुभम ढोणे. करण सहारे. करण नागोसे. शंकर तराळे व अन्य नागरिक उपस्थितीत होते