🔹दोटकुलीतील नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप; जीवितहानी झाल्यास प्रशासन जीम्मेदार
✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.6 जानेवारी) :- चामोर्शी दोटकुली गावातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता अद्यापही उपलब्ध करून न दिल्याने संतप्त नागरिकांनी दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात अर्जदार श्री. हनाजी कैकाडू शेंडे व इतर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय, दोटकुली तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे लेखी निवेदन सादर केले आहे. याआधीच दिनांक २६/१२/२०२५ रोजी “दहा दिवसांत रस्ता न काढून दिल्यास आमरण उपोषण करण्यात येईल” असा इशारा देण्यात आला होता. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
निवेदनानुसार, दोटकुली येथील श्री. शिवराम नानाजी ढोबे यांच्याकडून संबंधित नागरिकांना ये-जा करण्यास अडथळे आणले जात असून, त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रागाच्या भरात कोणतीही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला असून, रस्ता मोकळा करून न दिल्यास उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अनेक वेळा विविध प्रशासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने आता आमरण उपोषण हाच शेवटचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत प्रतिलिपी; प्रश्न गंभीर
दोटकुली येथील रस्त्याच्या प्रश्नाबाबत करण्यात आलेल्या निवेदनाची जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रतिलिपी देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), भूमी अभिलेख विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाचा समावेश आहे.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे जिल्हा प्रशासन तातडीने लक्ष देणार का? आणि उपोषणापूर्वी तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







