🔹भाविकासह नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
✒️शेख रफीक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.7 नोव्हेंबर) :-
तीर्थक्षेत्र माहूरगड हे देवदर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक भक्तांना आकर्षित करणारे धार्मिक स्थळअसल्याने येथे भाविक भक्तासह अघोरी प्रकार करणारे गुप्तधनाच्या शोध घेणारे हौसे गौसे नौसे हजारो च्या संख्येने येतात पोलीस बळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य होत नसल्याने गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या किल्ल्यात धुडगूस घालतात तर अघोरी प्रकार करणारे तथाकथित बाबा येऊन येथे अघोरी विद्या सफल करण्याचा प्रयत्न करतात असाच प्रकार दि 6 रोजी दत्तशिखर रोडवर घडल्याने भाविकासह नागरिकात घबराटीचे वातावरण पसरल्याने पोलिसांनी या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
दि 6 रोजी दूपारच्या वेळी काही नागरिक दत्तशिखर पुलाजवळून जात असताना त्यांनी एका महिलेसह दोन पुरुष अधोरी विधी करताना पाहिल्याचे सांगितले. महीला खाली बसून पुजा करत होती तर बाजूला कोयता होता, तसेच त्या ठिकाणी रक्ताचे डाग आणि काही पूजाविधीची सामग्री आढळली. महिलेच्या कपाळावर रक्ताचा ‘तिलक’ लावलेला असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांनी सांगितले.
विधी संपल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, एका बोकड मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये अघोरी विद्येचा प्रयोग केला गेला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तात्काळ तपासाची मागणी केली आहे.
हा अंधश्रद्धेचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाविक भक्त मोठ्या संख्येने श्रीक्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे अशा घटनांमुळे धार्मिक वातावरणावर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी गडासह जंगलात फेरफटका मारण्यासाठी विशेष पथकाची तात्काळ नेमणूक करावी अन्यथा या आधी घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चिंता व्यक्त होत आहे.







