अवादा च्या मनमानी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

🔹सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाने कंपनीचा शेत शिवारात धिंगाणा

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.8 नोव्हेंबर) :- 

अवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाने अवादा कंपनीने उटी शेतशिवारात प्रचंड धिंगाणा घातला आहे. गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांचा आवाज चिरडून ही कंपनी अगदी रानटीपणे शेत शिवारात सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पुढे दामटत आहे. अवादाच्या या मुजोरशाहीला आवर घालण्यात शासन आणि प्रशासनही हतबल ठरल्यामुळे उटी येथील संतप्त शेतकरी आज महागाव तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनवर धडकले. अवादाच्या बेलगाम कारभाराचा पाढा अधिकाऱ्यांपुढे वाचून शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. 

शेतकऱ्यांची पूर्वसंमती न घेता अवादा कंपनीने शेतशिवारात अवैधरित्या गाडलेले सौरऊर्जेचे विद्युत खांब आणि नागरिकांच्या घरावरून गेलेली उच्च दाब विद्युत वाहिनी त्वरित काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी केली आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाने अवादा कंपनीने उटी शिवारात वृक्षांची प्रचंड कत्तल चालविली असून या वृक्षतोडीबाबत शासनाने त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. विद्युत वितरण कंपनीने उटी शिवारात ८ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अवादा कंपनीला कंत्राट दिल्याचे कळते, परंतु शेतकऱ्यांच्या भावभावना व संवैधानिक हक्क पायदळी चिरडून अवादा कंपनी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम मनमानीपणे पुढे रेटत असल्याचा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा विद्युत वाहिनीचे खांब रोवताना कंपनीने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही किंवा परवानगी सुद्धा घेतली नाही असा आरोप तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून शेतकरी निळकंठ जयवंत गावंडे, प्रतिभा अवधूत गावंडे व अन्य शेतकऱ्यांनी केला आहे.

विद्युत खांब रोवतांना शेतातील वृक्षांची अवैधरितरीत्या बेसुमार कत्तल करण्यात आल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रस्त्यालगत जनावरांचे गोठे बांधायचे होते परंतु आता विद्युत तारांचे स्पार्किंग होऊन जीवित हानी होऊ शकते अशी शेतकरी बांधवांची रास्त तक्रार आहे. मुळात ही उच्च दाब विद्युत वाहिनी गावाबाहेरून जाणे अपेक्षित होते. परंतु सर्व नियम धाब्यावर बसून व गावकऱ्यांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षदा लावून अवादा कंपनीने मनमानी पद्धतीने विद्युत वाहिनी शेतातून व नागरिकांच्या घरावरून नेली असा आरोप होत आहे.

अवादा कंपनीने सौर ऊर्जा वाहिनीचे खांब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत मनमानी पद्धतीने उभे केल्याचाही आरोप होत असून महागाव ते उटी रस्त्यावर सुद्धा अनेक खांब रस्त्याच्या हद्दीत रोवण्यात आल्याची तक्रार प्रशांत गावंडे यांनी केली आहे. उटी गावाच्या रहदारीचा व वहिवाटीचा महत्त्वाचा थांबा असलेल्या चौकात सौर ऊर्जा वाहिनीचा खांब रोवण्यात आला असून येथे गावकरी व शाळकरी मुले थांबतात. येथे स्पार्किंग होऊन भविष्यात मोठी जीवित हानी होण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नियमानुसार व पूर्वीच्या नकाशानुसार विद्युत वाहिनीचे काम करण्यात येत नसल्याचा गंभीर आरोप शेतकरी व गावकऱ्यांनी केला आहे. अवादा कंपनीची यंत्रणा प्रचंड मुजोर असून शेतकऱ्यांशी अरेरावी केली जात असल्यामुळे उटी येथे संतापाचे वातावरण आहे. आज उटी येथील अनेक शेतकरी निवेदन घेऊन महागाव पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयावर धडकले. अवदा कंपनीच्या हुकूमशाही कारभाराला चाप लावून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल अडकिने, शेतकरी प्रशांत गावंडे, भाजपाचे कार्यकर्ते समाधान ठाकरे, विलास खिल्लारे, विठ्ठल शिंदे, उत्तम इनकर व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

विद्युत वाहिनेचे काम नियमानुसारच

(विद्युत वितरण कंपनीकडे १.३ टक्के सुपरव्हिजन चार्ज भरूनच त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने विद्युत वाहिनीचे काम केले जात आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कंपनीचा नाही तर गावाचा विकास होणार आहे. शेतकऱ्यांची परवानगी न घेता प्रकल्पाचे व विद्युत वाहिनीचे काम आम्ही कसे करणार ? गावात पंधरवड्यापूर्वी गावकऱ्यांनी विद्युत वाहिनीचे काम थांबविले होते तेव्हा विद्युत वितरण च्या उपकार्यकारी अभियंत्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन आम्ही वाद मिटवला. विद्युत वाहिनीचे काम नियमानुसार सुरू आहे.)…नवीन कुमार,प्रोजेक्ट मॅनेजर, अवादा कंपनी प्रा.लि.