प्रियकराच्या साथीने पत्नीने केला पतीचा खून

दीड महिन्यानंतर उघडले रहस्य पत्नीने पतीला पैनगंगा नदीच्या खरबी(किनवट) येथील पात्रात जिवंत फेकले

🔸मृत्यूदेह महागाव तालुक्यांत कासारबेहळ येथे आला वाहून

🔹पोलिसांनी बेवारस मृतदेह दफनविधी केला होता. पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी किनवट येथील पथक महागाव तालुक्यांत दाखल झाले

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.18 ऑक्टोबर) :- 

अनैतिक संबंधात अडथळा ठरू पाहणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचला आणि दारूच्या नशेतअसलेल्या पतीला खरबी पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिले. तब्बल दीड महिन्यानंतर किनवट पोलिसांनी या खुणाच्या प्रकरणाचा छडा लावत पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

   सिंदगी मोहपुर येथील मूळ रहिवासी परंतु गोकुंदा तालुका किनवट येथे वास्तव्यास असलेला विनोद किशन भगत वय 51 वर्षे यांचा सुखी संसार सुरू होता. त्याचवेळी त्याची पत्नी प्रियंका किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या रफिक जाळ्यात अडकली. अनैतिक संबंध जुळल्याने पती विनोद भगत दोघांच्याही संबंधात अडथळा ठरू लागल्याने दोघांनी संगणमत करून 29 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिले.

यानंतर मयताची पत्नी प्रियंका हिने 3 सप्टेंबर 2025 रोजी किनवट पोलीस ठाण्यात प्रती बेपत्ता असल्याची तक्रार केली. मात्र मयताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला, हाच धागा पकडून किनवट पोलीस पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईल मधील एका क्रमांकावर वारंवार झालेले काल पोलिसांना संशयस्पद वाटले. त्या नंबरच्या व्यक्तीला प्रियकर शेख रफिक ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आणि खुणाचे रहस्य उलगडले. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलीस पथकाने तपास कार्य केले. 

महागाव तालुक्यात सापडले प्रेत

वाहून आलेले प्रेत बेवारस समजून महागाव पोलिसांनी त्याच्यावर दफनविधी केला होता. मृतदेहाची माहिती महागाव पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना कळवली होती. किनवट येथे दाखल मिसिंग प्रकरणाचा तपास किनवट पोलिसांनी केला. गुरुवारी फॉरेन्सिक लॅब आणि नातेवाईकांचे उपस्थित मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह विनोद भगत यांचा असल्याची ओळख पटविण्यात आली. 

महिन्याभरापूर्वी वाहून आला होता मृतदेह 

महागाव तालुक्यातील कासारबेहळ येथे महिन्याभरापूर्वी पैनगंगा नदीच्या पुरात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. मात्र ओळख पटली नाही. अखेर बेवारस म्हणून दफनविधी केला होता. त्या नंतर आता धक्कादायक वास्तव पुढे आले.