🔹वरोरा तालुक्यातील परसोडा येथे बसथांबा असूनदेखील प्रवाशांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. खैरगाव आणि परसोडा या दोन गावांचा एकच बसथांबा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी या ठिकाणी थांबतात
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.17 ऑक्टोबर) :–चिमूर महामार्गाचे काम सुरू होताना या ठिकाणी असलेला जुना प्रवासी निवारा पाडण्यात आला, मात्र काम पूर्ण होऊनही तो अद्याप पुन्हा उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिक, विद्यार्थी व प्रवासी यांना उन्हात, पावसात रस्त्याच्या कडेला उभं राहून बसची वाट पाहावी लागते.
या गंभीर समस्येची दखल घेत परसोडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम शिवशंकर आमने यांनी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देत प्रवासी निवारा बांधण्याची विंनती केली आहे.
निवेदनाद्वारे शुभम आमने यांनी विद्यार्थी, वृद्ध व इतर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या ठिकाणी प्रवाशांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.







