✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर (दि.18 ऑक्टोबर) : – माहूर तालुक्यातील वानोळा जिल्हा परिषद सर्कलमधून आगामी निवडणुकीत भाजपाचे तडफदार व कार्यक्षम युवा पदाधिकारी संदीप गुणाजी राठोड हे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे. पक्षाने त्यांना संधी दिल्यास ती संधी सोने करण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संदीप राठोड हे २०१२ पासून पक्षाच्या विविध संघटनात्मक पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी बूथ प्रमुख, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (नांदेड उत्तर) अशी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. सध्या ते भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव आणि हिंगोली जिल्हा प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.
राठोड यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रम राबवून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एक सक्रिय व संघटित नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात पक्षाच्या विविध अभियानांना गती देत त्यांनी नेतृत्वावर आपली कार्यशैली ठसवली होती.
पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि संघटन कौशल्य या गुणांच्या जोरावर राठोड यांनी वानोळा परिसरातील जनतेत आपले भक्कम संपर्क जाळे तयार केले असून, जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाल्यास ती एक युवा नेतृत्वाची झेप ठरेल, अशी चर्चा स्थानिक कार्यकर्त्यांत रंगली आहे.







