पारोधी शेतशिवारात कोंबडा झुंज जुगारावर पोलिसांची कारवाई

🔹दोन आरोपी ताब्यात, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि.17 ऑक्टोबर) :–

            दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी शेगाव बु. पोलिस स्टेशनच्या पथकाने पारोधी शेतशिवारात कोंबडा झुंज जुगारावर छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण ₹4,37,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

        सदर कारवाई पोलीस अंमलदार प्रफुल सिद्धार्थ कांवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश ताटेवार व ज्ञानेश्वर केकान यांनी केली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पारोधी येथील सूर्यकांत वेले यांच्या शेताजवळील जंगल परिसरात काही इसम कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैशाची बाजी लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकला.घटनास्थळी पोलिसांना पाहताच काही इसम पळून गेले, तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे गोपीचंद गोमाजी कामडे (वय 47, रा. पारोधी, ता. भद्रावती) व नितेश नारायण हनवते (वय 32, रा. वडेगाव, ता. भद्रावती) अशी आहेत.

       चार कोंबडे, दोन धारदार लोखंडी कात्या, ₹2,600 नगदी रक्कम तसेच पाच दुचाक्या — बजाज पल्सर, बजाज पल्सर. हिरो स्प्लेंडर. हिरो फॅशन प्रो. व TVS NTORQ. असा एकूण ₹4,37,000/- किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रफुल कांवळे यांनी दिली.