राजुरा येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र व भाजपा राजुरा विधानसभा क्षेत्राच्‍या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन Grand opening of Sudhirbhau Mungantiwar Seva Kendra and Public Relations Office of BJP Rajura Assembly Constituency at Rajura

▫️राजुरा विधानसभा प्रभारी देवराव भोंगळे यांची झंझावाती सुरूवात(Rajura Vidhan Sabha in-charge Devrao Bhongle’s tumultuous start)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.14ऑगस्ट) : – सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. पण या योजनांची माहिती त्यांना नसते. बरेचदा माहिती असूनही त्याचा लाभ कसा घ्यावा, हे कळत नाही. अशावेळी गरजूंच्या पाठिशी उभे राहण्याचे काम सेवा केंद्र करणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या निमीत्‍ताने देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या कामाचा झंझावात सुरू झाला आहे, असे प्रतिपादनही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेला ईश्वराप्रमाणे मानले आहे. संसद जनतेची सेवा करण्यासाठी आहे. भाजपने माणूसकीच्या धर्माचे पालन केले आहे आणि याच भावनेतून जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे जात, पात, धर्माचे बंधन न ठेवता हे सेवा केंद्र जनतेची सेवा करेल, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

राजुरा येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र व जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, आरपीआयचे सिद्धार्थ पिथाडे, भाजपा चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा महामंत्री अल्का आत्राम, भाजयुमोचे प्रदेश सचिव आशिष देवतळे, नामदेव डाहुले.

विवेक बोढे, अरुण मस्‍की, राजुरा तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, बबन निकोडे, सतिश उपलेंचीवार, अमर बोडलावार, विलास बोंगिरवार, पोंभुर्णा नगरपरिषद अध्यक्षा सुलभा पिपरे, चेतन गौर, संजय गजपुरे, दीपक सातपुते, नारायण हिवरकर, वाघुजी गेडाम, हरीभाऊ घोरे, महेश देवकाते, विजयालक्ष्मी डोहे, सुनंदा डोंगे, सुरेखा श्रीकोंडावार, दत्ता राठोड, तुकाराम वारलवाड, अरुण मडावी, सतीश कुमरवेल्लीवार, विनायक देशमुख, पुरुषोत्तम भोंगळे, अरविंद डोहे, इंद्रपाल धूडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे यांच्या कार्याचा गौरव केला. “जो करता है सेवाभाव उसका नाम है देवराव” अशा शब्दात ना. मुनगंटीवार यांनी देवराव भोंगळे यांच्या कार्याची स्तुती केली. राजुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्य व गोरगरिबांना योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वासही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

भाजपा राजुरा विधानसभा प्रभारी देवराव भोंगळे यांनी याआधीही घुग्‍गुसला असे सेवा केंद्र सुरू करून तेथील जनतेच्‍या समस्‍या सोडविण्‍याचे काम केले आहे. त्‍याच धर्तीवर राजुरा विधानसभेच्‍या जनतेच्‍या समस्‍या सोडविण्‍याचे काम या सेवा केंद्रातुन होईल असा विश्‍वास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.

ना. मुनगंटीवार यांनी सेवा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले. ते म्हणाले, ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुलें… तो चि साधु ओळखावा, देव तेथें चि जाणावा.. हे संत तुकारामांचे वचन आपण बालपणापासून ऐकतोय. आज सेवा केंद्राचे उद्घाटन करत तुकाराम महाराजांच्या शब्दांना यथार्थ करण्याचे काम राजुरा येथील भाजपाचे विधानसभा प्रभारी देवराव भोंगळे व अन्‍य पदाधिकारी, नेते करीत आहेत. गोरगरिबांची सेवा करण्याचा संकल्प करत सेवाभावी वृत्तीने या सेवा केंद्राचा शुभारंभ होत आहे, याचा आनंद आहे.’

या जिल्ह्यातील जनतेने भाजपावर मनापासून प्रेम केले. जनतेने जे काही दिले ते नम्रपणे स्वीकारायचे असते. आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू सेवा असायला हवा, खुर्ची नव्हे. पद गेले तरीही आपल्या कामांची आठवण जनतेला राहील, या उद्देशाने कार्यकर्ता काम करीत आहे. आणि आता हे सेवा केंद्रही त्याच उद्देश्यांनी काम करणार आहे,’ असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

एखादी व्यक्ती आजारी असते. कुटुंब उपचारासाठी खर्च करताना मानसिक तणावात असते. उपचारानंतरही अनेक वर्षे त्या खर्चाचा ताण जात नाही. मात्र सरकारने आरोग्य योजनांच्या माध्यमातून जनतेची सोय केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत तर ५ लाखांपर्यंतचा खर्च उपचारासाठी दिला जातो आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारची उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मात्र या योजनेची माहिती नसेल तर सेवा केंद्र ती उपलब्ध करून देईल. सेवा केंद्र आपल्या पाठिशी उभे राहील, असा विश्वासही ना. मुनगंटीवार यांनी दिला.

दिड कोटी शेतकऱ्यांनी डिजीटल सुविधेद्वारे एक रुपयांत पिक विमा काढला. मात्र अनेक शेतकरी ऑनलाईन सुविधा वापरू शकत नाहीत. अशांच्या पाठिशी सेवा केंद्र उभे राहिले पाहिजे. माहिती नसल्यामुळे कुणी सुटता कामा नये. सेवाकेंद्राला भेट देणाऱ्या सर्वांचे कामं व्यवस्थित झाले पाहिजे याची पूर्ण काळजी सेवा केंद्राला घ्यायची आहे, अशी सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. राजुरा विधानसभा मतदारसंघाला विकासात असे काही पुढे न्या, की इतर मतदारसंघांना हा विकास बघून ईर्ष्या होईल, या शब्दांत त्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

याप्रसंगी बोलताना देवराव भोंगळे म्‍हणाले की, ज्‍या सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आम्‍हाला नरसेवा हीच नारायण सेवा असे समजून जनतेची सेवा करण्‍याचा मंत्र दिला त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी तो दिवस सेवादिन म्‍हणून साजरा करत असतो व त्‍या दिवशी घुग्‍गुस व पोंभुर्णा येथे वैद्यकिय शिबीरे मोठया प्रमाणात भरविले जातात. ज्‍याचा लाभ हजारों नागरिकांना होत असतो.

त्‍याच धर्तीवर पुढील वर्षीपासून घुग्‍गुस व पोंभुर्णा सहीत राजु-यालाही असे वैद्यकिय शिबीर भरविण्‍यात येईल. मी आता नियमितपणे राजुरा येथे राहणार आहे. त्‍यामुळे आपल्‍या विधानसभा मतदान क्षेत्रातल्‍या समस्‍या आपण मला भेटून सांगू शकता, असेही देवराव भोंगळे म्‍हणाले. जनतेच्‍या सेवेसाठी घुग्‍गुस येथे सुरू केलेल्‍या सेवा केंद्राचा दुसरा अध्‍याय राजुरा येथे सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व भागातील कार्यकर्त्‍यांनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्‍वी केल्‍याबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्रभारी देवराव भोंगळे यांनी आभार मानले आहेत.