अवैध साठा शोधून तंबाखु व गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करा Find illegal stocks and take action against those selling tobacco and gutka

225

🔹 जिल्हाधिका-यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश(Collector’s direction to Food and Drug Administration)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर ( दि. 29 एप्रिल) :- जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अवैध साठा शोधून तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सुरक्षित अन्न आणि निरोगी आहारासाठी सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. टोपले, पोलीस निरीक्षक रोशन पाठक, पोलीस विभागाच्या अपर्णा मानकर, जिल्हा महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडूरंग माचेवाड, मनोहर चीटनुरवार तसेच ग्राहक संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अवैध सुगंधीत तंबाखू, सुपारी गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कार्यवाही करावी. पोलीस विभागाने याबाबत माहिती घ्यावी. ज्या अन्नपदार्थ विक्रेत्यांकडे व व्यावसायिकांकडे अन्न परवाना नाही, याबाबत चौकशी करून अशा आस्थापनांना भेटी द्याव्यात. अन्न व्यावसायिकांचे परवान्याचे नूतनीकरण करावेत. तसेच इट राईट चॅलेंज उपक्रमांतर्गत अन्नपदार्थाविषयक माहिती द्यावी. जेणेकरून, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होईल, असे ते म्हणाले.