नांद्रा परिसरात दोन पिलांसह वाघिणीचा वावर

🔸जंगलातील रस्ते वनविभागाने केले बंद

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.6 एप्रिल) :- भटाळा- टेंभुर्डा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या केम, बोरगाव,(भो) कोटबाळा,नांद्रा गावाच्या परिसरात दोन पिलांसह वाघीण फिरत असल्यामुळे या परिसरात शेती व इतर कामे करीत असताना ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा वनविभागाने दिला आहे.

वरोरा तालुक्यातील टेंभुर्डा क्षेत्र सहाय्यक कार्यालया अंतर्गत येत असलेल्या केंब बोरगाव ताडगव्हाण नांद्रा कोटपाडा या गावाला जंगल लागून आहे त्यामुळे या परिसरात नेहमीच पट्टीदार वाघांचा वावर असतो.

या परिसरात यापूर्वी अनेकदा वाघाने पाळीव प्राण्यांचे शिकारी सुद्धा केल्या आहे. यामुळेच या परिसरात टेंभुर्डा क्षेत्र सहाय्यक कार्यालयातील वन विभागाचे कर्मचारी नेहमी गस्त घालत असतात. ठीक ठिकाणी लावलेल्या नाईट विजन कॅमेऱ्यामध्ये वनविभागाला पट्टेदार वाघिणीसह दोन शावक फिरताना आढळले त्यामुळे वन विभागाने उपवन क्षेत्राच्या सभोवताली गस्त वाढविली आहे. तसेच गावातील नागरिकांना जंगलात न जाण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

वनविभागाने जंगलातून जाणारे रस्ते सावधगिरी म्हणून बॅनर लावून बंद केले आहे तसेच या परिसरात इतरही पट्टीदार वाघ फिरत असल्याने चांगला लगत कामाला जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.