✒️ आम्रपाली गाठले शेगांव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगांव बू (दि.31 मार्च) :- मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर तसेच सिखे संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या टीचर इनोव्हेटर कार्यक्रमांतर्गत भद्रावती पंचायत समितीतील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेगांव येथे विद्यार्थ्यांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.
या प्रदर्शनीनिमित्त सिखे इंडिया उत्सवाची प्रभातफेरी काढण्यात आली. ” सिखेगा भाई सिखेगा, हर एक बच्चा सिखेगा,” “नही रहेंगे नही रहेंगे, घरमे बच्चे नही रहेंगे,” “शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी, सिखे कार्यक्रम सर्वांसाठी,” कठीण शब्द काढू या, अर्थ त्याचा जाणू या,” चौकट कागद आमच्या हाती, गणित होई आमचा साथी,” अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. यांत केन्द्रप्रमुख, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, माता पालक संघाचे सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या प्रदर्शनीचे उद्घाटन शेगांव खुर्दचे युवा सरपंच मा. मोहित लभाने यांनी केले. याप्रसंगी शेगांव केंद्राचे केंद्रप्रमुख मा. अनिल मत्ते, चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याचे समन्वयक मा. हर्षवर्धन डांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे मा. भिवधरे, माता पालक संघाच्या अध्यक्षा व सदस्या, केंद्रातील नऊ शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सह- संबंध लावणे, मला पडणारे प्रश्न, विविध प्रकारचे प्रश्न तयार करणे, सारांश लेखनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती, कठीण शब्दांचा अर्थ काढणे, संख्यारेषा, चौकट पद्धत तसेच नंबर बॉण्ड पद्धतीवर आधारित आर्टिफॅक्टस व मॉडेल्सच्या रुपात विद्यार्थ्यांनी आपली भाषिक आणि गणितीय अध्ययन क्षमता कशी विकसित झाली, ह्याचे सादरीकरणातून स्पष्ट केली. या प्रदर्शनाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
