जिल्ह्याचा विकास आराखडा विविध विभागांनी समन्वयातून तयार करावा – जिल्हाधिकारी विनय गौडा The development plan of the district should be prepared by various departments through coordination – Collector Vinay Gowda

136

🔹जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध विषयांचा आढावा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर( दि. 26 एप्रिल) : – पुढील 25 वर्षासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्याची सद्यस्थिती, भविष्यात करावयाची कार्यपद्धती तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करताना संबंधित सर्व विभागांनी समन्वयातून पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू जिल्हा नियोजन अधिकारी ग.रु.वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्याची काय सद्यस्थिती आहे? पुढे साध्य करण्याची ध्येय त्यासाठी करावयाची कार्यवाही यासाठी शासनाने मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सन 2022 ते 27 या पाच वर्षासाठीचा पहिला ॲक्शन प्लॅन, सन 2027 ते 37 दुसरा तर सन 2037 ते 47 असा तिसरा ॲक्शन ध्येय साध्य करण्यासाठी करण्यात येत आहे. पाच वर्षासाठी प्रत्येक जिल्ह्याने हा प्लॅन तयार करावयाचा आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने विविध क्षेत्रनिहाय जसे कृषी, उद्योग, पर्यटन याबाबतची सद्यस्थिती व पुढील पाच वर्षासाठी व भविष्यात ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करावयाचे आहे.

यासाठी प्रत्येक विभागाने एकत्रित माहिती अद्यावत करावी. व त्यासंदर्भात नियोजन करावे..माहिती हवी असल्यास सांख्यिकी अधिकारी व संबंधित विभागाशी समन्वय ठेवावा. आवश्यक ती माहिती पुरवावी. प्रत्येक क्षेत्रिय सब ग्रुप तयार करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. तसेच सर्व विभागांनी समन्वयाने चर्चा करून सूक्ष्म नियोजनासह प्लॅन तयार करावा.विभाग प्रमुखाने प्लॅन तयार करताना स्वारस्य ठेवावे व कर्तृत्वाची भावना ठेवून कार्य करावे, असेही ते म्हणाले.

*जिल्हाधिकाऱ्यांकडून वंदे मातरम चांदा प्रणालीचा आढावा*

नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी वंदे मातरम चांदा ही तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र,काही विभागात बऱ्याचशा तक्रारी प्रलंबित आहे. सदर प्रलंबित तक्रारीचे 15 दिवसात निराकरण करावे.

यासाठी विभाग प्रमुखांनी तक्रारीच्या निवारणासाठी आढावा घ्यावा. 25 ते 30 दिवसापर्यंत प्रलंबित सर्व तक्रारीचे तातडीने निरासरण करावे. तक्रारीचे निराकरण होत आहे का, याबाबत खात्री करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी बैठकीत उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या.