✒️चंद्रपूर(Chandrapurविदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क )
चंद्रपूर (दि.31 मार्च) :- अयोध्येतील राम मंदिर निर्माणसाठी महाराष्ट्रातील आलापल्लीचे प्रसिद्ध सागवान महाविकास आघाडीच्या काळात मंदिराच्या ट्रस्टने खरेदी केले होते.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वनमंत्री असताना एक करोड रुपयांमध्ये महाराष्ट्र सरकारने सागवान राम मंदिरासाठी विकले होते.
परंतु स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तात्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काष्ठपूजनाच्या नावाखाली जवळपास शासनाचे तीन करोड रुपये आपल्या स्वतःच्या प्रचार प्रसारावर उधळले असा आरोप उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केला.
रामलल्लाच्या निर्माणाधीन मंदिरासाठी लागणारे सागवान हे आलापल्लीवरून जाणार होते. या प्रक्रियेला धार्मिक रंग देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाच्या तिजोरीतून जवळपास तीन करोडची उधळपट्टी केली. मागील कार्यकाळात वनमंत्री असताना लिलावाची ऑफलाइन पद्धती बंद करून ऑनलाईन पद्धती सुरू केली.
यामुळे आशियातील सर्वात मोठ्या क्षेत्राचे डेपो असलेल्या भागातील आदिवासींचा व इतर छोट्या मोठ्या व्यवसायिकांचा रोजगार हिसकावण्याचे पाप मुनगंटीवार यांनी केले. लिलाव प्रक्रियेसाठी देशातून मोठ्या प्रमाणात लाकडाचे व्यापारी येत होते. त्यामुळे छोट्या मोठ्या व्यवसायांना त्याचा फायदा होत होता.
काष्ठपूजनाच्या नावाखाली विदर्भातील लोककलावंत असतांना त्यांनी मुंबई पुण्यातून जवळपास दोन हजार कलाकार चंद्रपुरात आणले. धार्मिक कार्यक्रमाला शासकीय रंग देऊन त्यांनी शासनाचे तीन करोड रुपये खर्च केले. एवढा मोठा पैसा जर बल्लारपुरातील प्रसिद्ध डेपोला लावला असता तर त्याचा कितीतरी फायदा वन विभागाला झाला असता. वनविभाग अनेक समस्याने ग्रस्त असून वनविभागाचे बरेच कामे निधी अभावी रखडलेले आहेत.
शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी ह्या समस्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून यासाठी शासकीय पैसा खर्च करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी शासकीय पैशाची उधळपट्टी करणे हे कितपत योग्य आहे याचे उत्तर वनमंत्री यांनी जनतेला द्यावे असे आवाहन फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राजू झोडे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केले.
