वाघाचा शोध घेण्यासाठी सहा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे सू सज्ज

463

✒️चंद्रपूर (chandrapur) (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दी.19 फेब्रुवारी) :- वरोरा तालुक्यातील मोहबाळा परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये जीएमआर ही विद्युत निर्मिती कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास एक पट्टेदार वाघ सुरक्षा रक्षकाच्या नजरेस पडला. यानंतर सुरक्षा रक्षकाने सदर वाघाची हालचाल आपल्या मोबाईल मध्ये कैद केली व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच कंपनी अधिकारी व कामगार यांच्यात एकच खळबळ उडाली. ही माहिती लगेच वन अधिकारी आणि पोलिसांना देण्यात आली.

वन अधिकारी आणि प्राणी मित्र संघटनेचे सदस्य रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरापर्यंत वाघाचा शोध घेतला. तेव्हा दोन वेळा वाघाने त्यांना दर्शन दिले. यानंतर वनाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून सहा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहे. तसेच वाघांच्या हालचालीवर वन अधिकारी लक्ष ठेवून आहे. जीएमआर कंपनीला चारही बाजूने कंपाऊंड असताना वाघ आत कसा शिरला असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेअर हाऊस मार्गाने वाघ आत मध्ये आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान कंपनी परिसरात कोणीही पायदळ फिरू नये, फिरायचे झाल्यास चारचाकी वाहनांचा वापर करावा, असे निर्देश कंपनी अधिकाऱ्यांनी दिले आहे.

चक्क औद्योगिक वसाहती पर्यंत पट्टेदार वाघ येऊन पोहोचल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये सुद्धा दहशतीचे वातावरण आहे. वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, क्षेत्र सहाय्यक संजय खोब्रागडे, दिगांबर चांभारे, जितेंद्र लोणकर, वनरक्षक संदीप वाटेवर, अमोल नेवारे यांच्यासह वन्यजीवप्रेमी संघटनेचे विशाल मोरे यांचेसह वन कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून होते.