✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.7 जुलै) :- वरोरा परिसरातील जनतेमधील कर्करोगाचे लवकर निदान होण्याकरिता आणि कर्करोगाचे सुप्त लक्षणे ओळखण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने कर्करोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे. हे शिबिर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे 11 जुलै रोजी तर शेगाव येथे 14 जुलै रोजी आयोजित केले आहे.
सदर शिबिरामध्ये संस्थेमार्फत अत्याधुनिक मोबाईल कॅन्सर डायग्नोस्टिक वाहनामध्ये नाक कान घसा तज्ञ, मुखरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ आणि शरिरविकृती तज्ञ उपलब्ध राहणार आहेत. या तज्ञ व तंत्रज्ञा मार्फत मुखकर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यात येणार आहे. या मोबाईल डायग्नोस्तिक वाहनामध्ये ८० ते १०० रुग्णांची तपासणी क्षमता आहे.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कर्करोग निदान शिबिरात स्वतःची व आपल्या परिवारातील लोकांची तपासणी करण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वरोरातर्फे करण्यात आले आहे.
स्तन कर्करोगाचे लक्षणे •स्तनाच्या बोंडातून द्राव बाहेर येणे •स्तनांमध्ये गाठी येणे • स्तनांचा आकार कमी जास्त होणे • स्तनांवर लालसरपणा व पुरळ येणे • स्तन किंवा काखेजवळ सूज येणे, वेदना होणे.
या व्यतिरिक्त तीन आठवड्यापेक्षा अधिक दिवस तोंड किंवा जिभेवर घाव, ४ ते ५ अठवड्यापेक्षा अधिक काळचा अतिसार, ३ अठवड्यापेक्षा अधिक काळचा खोकला, मासिकपाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव, मूत्र विसर्जनास अडचण/ त्रास, लघविमधून होणारा रक्तस्त्राव, शौचातून रक्तस्त्राव, अन्न गिळताना सतत होणारा त्रास, न भरणारी जखम, सतत ताप येणे किंवा वजनात घट होणे, तीळ मस्सा यांच्या आकारात किंवा रंगात बदल होणे, भूक मंदावणे या पैकी कोणतेही लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रात डॉक्टरांशी संपर्क साधावा व शिबिराकरिता नाव नोंदवावे.
