✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि .13 ऑगस्ट) :- शहरातील प्रभाग क्र.1 मध्ये वसंतराव नाईक यांच्या तैलचित्रा लगत देशी दारू दुकान सुरू करण्यास दिलेल्या एनओ सी वरून मोठा वाद निर्माण झाला होता. या दारू दुकानाबाबत जनभावना जाणून घेण्यासाठी 12 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक वाघ आणि इतर अधिकारी महागाव शहरात दाखल झाले होते. नगरपंचायत कार्यालयात त्यांनी लोकप्रतिनिधीच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी सर्वांनी प्रस्तावित देशी दारू दुकानात प्रखर विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत महागाव शहरात देशी दारू दुकान सुरू होऊ देणार नाही असे निरीक्षक वाघ यांना सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी नगराध्यक्ष सुनंदा दिलीपराव कोपरकर, उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, काँग्रेसचे गटनेते शैलेश कोपरकर, महेश पाटील, नगरसेविका करुणा शिरबिरे, सुरेखा कोपरकर, सुनिता डाखोरे, रूपाली कोल्हेकर व इतर अनेक नगरसेवकांनी आपला स्पष्ट विरोध दर्शविला. शुभम बाबुलाल जयस्वाल व इतर तीन व्यक्तींना देशी दारूचे ना हरकत प्रमाणपत्र दिले असून नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर यांच्यावर आर्थिक तडजोड करून परस्परित्या ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. 24 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. 2 नुसार स्पष्ट करण्यात आले की अशा प्रकारचा निर्णय घेणे धोरणात्मक बाब नसून तो सभागृहाच्या मान्यते शिवाय घेता कामा नये, मात्र प्रभारी मुख्याधिकारी यांनी नियम धाब्यावर बसवत निर्णय घेतल्यामुळे संतप्त नगरसेवकांनी विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग पुसद येथील निरीक्षक वाघ यांच्याकडे लेखी जबाब नोंदविला आहे. जनमताचा कौल घेण्यासाठी एक्साइजचे निरीक्षक वाघ हे 12 ऑगस्ट रोजी महागाव शहरात दाखल झाले होते.
रस्त्यावर उतरून आमरण उपोषण करणार ; महिलांचा इशारा
महागाव शहरातील शांतता व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित अनुज्ञप्ती (सीएल3 क्र. 79) रद्द करून महागाव हद्दीत कुठेही दुकान सुरू होऊ देऊ नये, अशी जोरदार मागणी महिलांनी केली आहे. जर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर शेकडो महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा यावेळी स्पष्ट इशारा देण्यात आला.







