✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.13 ऑगस्ट) :- फुलसांगवी गावात माफियाराज निर्माण झाल्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही. गुंडागर्दीत सामान्य माणसाचे जीवन जगणे अवघड झाले. आपण शासनाचे प्रतिनिधी पोलीस पाटील म्हणून आज तागायत कार्य केले, परंतु आता या अवैध धंद्यामुळे व्याथीत होऊन येथील पोलीस पाटलांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचेकडे पोलीस पाटील पदाचा राजीनामा सादर केला.
फुलसांगवीत अवैध धंद्याने पराकोटीच्या सीमा ओलांडल्या आहेत. येथे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्याच्या भूमिका संशयास्पद वाटण्यास वाव निर्माण झाली आहे. फुलसांगवी मध्ये कायदा व सुव्यवस्था रस्सातळाला गेली आहे. तूर्तास अवैध धंद्याने हे गाव हब झाले आहे. या ठिकाणी अवैध जुगार, मटका, दारू, गांजा अशा विविध अवैध धंद्याने कहर केला.
फुलसांगवी गावी पोलीस पाटील म्हणून राजेश नाईक यांनी अनेक वर्ष पोलीस पाटील या पदावर कार्य केले. परंतु फुलसांगवी येथील दिवसेंदिवस वाढत असलेले अवैध धंदे, वाढत असलेली गुन्हेगारी यावर पोलीस विभाग निर्बंध घालण्यास कमी पडत आहेत. त्यामुळे आता पोलीस पाटील म्हणून या गावात काम करण्याची इच्छा उरलेली नसल्याचे नाईक यांनी दिलेल्या राजीनाम्यातून खुलासा केला.पोलीस व महसूल प्रशासन हे अवैध धंदे व गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी सक्त कार्यवाही करण्यात कमी पडत आहेत. पोलीस पाटील या नात्याने शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावातील नागरिकांना मला उत्तर देणे अशक्य झाले आहे.
त्या मुळे कठोर अंतकरणाने राजीनामा दिला आहे. तो राजीनामा तात्काळ स्वीकारुन स्वीकारून कार्यमुक्त करण्यात येण्याची विनंती राजेश त्रिंबकराव नाईक रा. फुलसांगवी यांनी 12 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना महागाव तहसीलदारांमार्फत राजीनामा सादर केला. राजीनामाच्या प्रति महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ, ठाणेदार महागाव यांना माहितीस्तव कळविले आहे.







