फुलसावंगी पेट्रोलपंपावरील जबरी चोरी प्रकरणी तिघे जेरबंद

🔹तिन्ही फरार आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.23 एप्रिल) :-

तालुक्यांतील फुलसावंगी रोडवरील पेट्रोल पंपावर घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

 १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या फिर्यादी व साक्षीदारांवर पेट्रोल भरण्याच्या कारणा वरून आरोपींनी गट्टू व फरशीने हल्ला केला. शिवीगाळ करत मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील सुमारे ११ हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून तिघे आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले होते. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०१/२०२६ अन्वये कलम ३०९(६), ३५२, ३(५) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने पुसद व उमरखेड परिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान,आरोपी खडका हायवेब्रिज परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये विकास उर्फ विक्की सुभाष देवकर (वय २३), अजय उर्फ जिवा बळीराम बोक्से (वय २३) व रामदास उर्फ रामू सिन्नना पवार (वय २२), सर्व रा. काळी टेंभी, ता. महागाव यांचा समावेश आहे. सुरुवातीला आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक धिरज बांडे, शरद लोहकरे यांच्यासह स्थानिकगुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाने सहभाग नोंदविला.

दरम्यान,तिन्ही आरोपींना पुढील तपासा साठी महागाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून,या प्रकरणाचा तपास सुरू आहे.