✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.12 जून) :-
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमातील कृषीदूतांनी महालगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. प्रवीण बदकल यांच्या शेतात विविध पेरणी पद्धतींचे प्रात्यक्षिक आयोजित केले. यावेळी एसडब्ल्यूसीएच (SWCH 9208) जातीच्या कापसाची पेरणी करून खरीप हंगामातील पेरणी कार्यास सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमात कृषीदूत नयन खोब्रागडे, संदीप जाटवे, अमन कारलेकर, वैभव काळे व ओम जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच शेतकरी कुटुंबातील ३ सदस्य व ५ महिला मजूर उपस्थित होत्या. शेत मशागतीसाठी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीचा वापर करण्यात आला.
प्रात्यक्षिकादरम्यान कृषीदूतांनी स्वतः शेतात उतरून कापूस पेरणी केली. तसेच उपस्थित महिला मजुरांकडून योग्य पेरणी तंत्र, बियाणे टाकण्याची पद्धत, ओळीतील अंतर व पेरणीनंतर घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. यामुळे विद्यार्थ्यांना पेरणी प्रक्रियेचा व्यावहारिक अनुभव मिळाला.
कार्यक्रमादरम्यान विविध पेरणी पद्धतींचे महत्त्व, त्यांचे फायदे व शेतकऱ्यांना होणारे लाभ याविषयी माहिती देण्यात आली. आधुनिक व पारंपरिक शेती पद्धतींचा समन्वय साधत कृषीदूतांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या उपक्रमामुळे कृषी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळाला असून शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होण्यास मदत झाली. उपस्थित शेतकऱ्यांनीही या प्रात्यक्षिकाचे कौतुक केले.







