✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.14 जून) :-
पिंपळगाव (मारोती) : RAWE कार्यक्रमांतर्गत पिंपळगाव (मारोती) येथील प्रगतशील शेतकरी अखिल धवणे यांच्या शेतामध्ये शेवगा (मोरिंगा) पिकाची लागवड करण्यात आली. सदर लागवड २ एकर क्षेत्रावर करण्यात असून ओडिसी-३ (ODC -3) या जातीची निवड करण्यात आली आहे.
या लागवडीसाठी शिरूर, पुणे येथून दर्जेदार रोपे आणण्यात आली. शेतात ६ × १२ फूट अंतरावर एकूण १२०० रोपांची लागवड करण्यात आली. लागवडीपूर्वी कृषीदूतांनी शेतकऱ्यांना खड्डे खोदण्याची योग्य पद्धत व खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक (Demonstration) दाखवून सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शेवगा लागवडीचे महत्त्व, योग्य अंतर, खड्डा भरण्यासाठी वापरावयाची सेंद्रिय खते तसेच रोपांच्या सुरुवातीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेवगा पिकातून अधिक उत्पादन व आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रामुख्याने पिकाचा उत्पादनाचा उपयोग हा निर्यातीसाठी होणार असून वाशी, पुणे, हैदराबाद या प्रमुख बाजारपेठा आहेत. या वाणाचे शेंग मध्यम आकाराची १-१.५ फूट लांब असून घरगुती उपयोगासाठी उत्कृष्ट आहे. ठिंबक सिंचनाद्वारे पिकासाठी योग्य ती पाण्याची सोय केली असून शासनाच्या सिंचन योजने अंतर्गत ती सोय करण्यात आली आहे. धवणे यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे वेळ न गमावता स्वतःच्या शेतामध्ये शेतीसंबंधी स्टार्टअप करायला प्रोत्साहित केले आहे.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पोतदार, रावे प्रभारी डॉ.आर.महाजन, कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.पातोंड, कार्यक्रम समन्वयक डॉ.आर.तायडे व विषय तज्ञ डॉ.ए.भोगावे यांचे अप्रत्यक्ष रित्या मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास कृषीदूत म्हणून आ.नि.कृ.म. वरोरा येथील सातव्या सत्रातील विद्यार्थी अभिषेक खारकर, मोहित राऊत, कृष्णा निकम, अथर्व निखारे व ओम पाठक उपस्थित होते.कृषीदूतांच्या या उपक्रमाचे परिसरातील शेतकऱ्यांनी कौतुक केले असून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी उत्सुकता दर्शविली.







