🔹आमदाराच्या उदासीन धोरणाचा तालुक्यांतील मतदारांना फटका
✒️विश्वनाथ महामुने महागाव यवतमाळ(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.22 एप्रिल) :-

उमरखेड- महागांव विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना जनतेने भरभरून मतदान रुपी आशीर्वाद दिला. परंतु जनता सध्या महागाई, गॅसटंचाई,पाणीटंचाई,वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा यामुळे प्रचंड उष्णतेच्या लाहीने कमालीचे हैराण झाले आहे. दैनंदिन अत्यावश्यक सुविधा मिळणे दुरापस्त झाल्या आहेत.विद्यमान आमदारांना जनतेचा समस्येचा जणू विसर पडला आहे.
आमदार किशन वानखेडे यांना महागाव तालुक्यांतून मतदारांनी लीडदेत मतदार संघाच्या समस्या मांडण्यासाठी विधानसभेत पाठवले आहे.परंतु तालुक्यांतील जनतेला सावत्रपणाची वागणूक मिळत आहे, तालुक्यांची सध्या ‘घरका ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,गॅसची टंचाई,जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड गगनाला भिडलेले भाव,सतत खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे प्रचंड नागरिक कमालीचे वैतागले आहेत. सामान्य जनता आमदारा विषयी नाराजी व्यक्त करत आहेत.
निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात होत असलेली फरफट यामध्ये मोठी दरी असल्याचा नागरिकांतून आरोप होत आहे.
महागांव तालुक्यांतून आ.किशनराव वानखेडे यांना मतदारांनी लीड देऊनही जनतेला वाऱ्यावर सोडल्यानेअपेक्षा भंग पावल्याचा खेद व्यक्त होत आहे.
दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने शहरालगत असलेले पुसनदीचे पात्र ठणठणाट झाले गुरावासरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
20 एप्रिलरोजी सायंकाळी पावणे नऊ वाजताच्या दरम्यान काळी (दौ.), परिसरातील वागद (ई.), बोरी,साई आणि पोहंडूळ यासह तालुक्यांत वादळी वाऱ्यासह हालका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.विद्युत सेवा खंडित झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. अनेकांच्या शेतमालाचे नुकसान झाले.महागांव शहरातही विद्युतसेवा कोलमडल्याने अनेकांनी समस्या बाबत आमदाराकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
महागाव एमएसईबीचे भिजत घोंगडे नेहमीचे झाले असून या ठिकाणी अभियंता सतत अनुपस्थित राहत असल्याने विद्युत समस्यांचे बारा वाजले. सायंकाळी सात वाजल्या पासून ते रात्री दोन वाजेपर्यंत नियमितपणे विद्युत पुरवठा बंद राहतो,ज्यामुळे सामान्य नागरिक शेतकरी,विद्यार्थी आणि व्यापारी यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विधानसभेमध्ये महागांव तालुक्यांतील मतदारांनी आमदार वानखेडे यांना जवळपास 20 हजार मतांची आघाडी दिली आहे. जनतेच्या विश्वासाचा आणि पाठिंब्याचा आमदारांनी निश्चितच आदर ठेवला पाहिजे अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांनी पुढाकार घेत महागांव तालुक्यांतील विद्युत समस्या बाबत अधिकाऱ्या सोबत एक बैठक लावून नियोजन करीत नागरिकांनाही या बैठकीला आमंत्रित करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शेतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. याशिवाय शेती पंपासाठी दिवसा सुरळीत वीज पुरवठा करावा,तसेच गाव-खेड्यांमध्ये दिवसा सुरू असलेला लाईनचा लपंडाव तात्काळ बंद करून नियमित वीजपुरवठा सुरळीत करावा,अशी महागाव परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे सिंचनावर परिणाम होत असून,शेतीची संपूर्ण नियोजन विस्कळीत होत आहेत.तालुक्यांतील अनेक गाव-खेड्यांमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दुरुस्ती अभावी अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित असून,येणाऱ्या पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिझेल व पेट्रोल टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डिझेल अभावी शेती मशागत ठप्प झाली असून ज्वारी व हळद काढणी सारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत.अनेक ठिकाणी ट्रॅक्टर तासन्तास पेट्रोल पंपावर रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे.
गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून,घरगुती सिलिंडर मिळण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या तडाख्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांचे अधिकच हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींना महागांव तालुका निवडणुकीपुरताच आठवतो का? विकासकामांकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जाते? असा संतप्त सवाल करंजखेड येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश भांगे यांनी उपस्थित केला आहे.
एकूणच,पाणीटंचाई,वीज समस्या, रस्त्यांची दुरवस्था तसेच इंधन व गॅस टंचाई या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने महागांव तालुक्यांत असंतोष उफाळून आला आहे.शेती पंपासाठी दिवसा नियमित वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील वीज वितरण सुरळीत करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली. संबंधितांकडून ठोस निर्णय न झाल्यास नागरिकांकडून लवकरच आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.







