🔸मडावी कोलाम आदिवासी परिवार व गावकऱ्यांची रस्ता, पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी
✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा(Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.19 एप्रिल) :-

जिवती तालुक्यातील पीट्टीगुडा नंबर २ येथून साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर मडावी कोलाम आदिवासी परिवाराचे अतिशय प्राचीन असे टोटेम (कुलप्रतीक) सुईवेलार भुयारी सारजमाता देवस्थान आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात हे देवस्थान असून मूलभूत सुविधांपासून मात्र वंचित व दुर्लक्षित असल्याने फारसे मुख्य प्रवाहात आले नाही. या देवस्थानाची अतिशय प्राचीन आख्यायिका असून कोलाम आदिवासींचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे. याठिकाणची परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रा.डॉ. विठ्ठल आत्राम यांच्या मार्गदर्शनात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राज्याध्यक्ष बादल बेले, मनोज तेलिवार, राजेंद्र कुळमेथे सोबत देवस्थान समिती चे अध्यक्ष जंगू भीमराव मडावी, उपाध्यक्ष झाडू देवराव मडावी, सचिव भीमराव मुत्त्ता मडावी, रामू पगु मडावी , मानकू भीमु मडावी , मुथा लेतू मडावी , जैतू मडावी , झाडू कोडापे आदींसह महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश येथील आदिवासी बांधव उपस्थित होते. सारजमातेला पेरणीपूर्वी बियाणे दाखवून मगच शेतात पेरणी केली जाते. कुटुंबातील शुभ प्रसंगी सारजमातेची पूजा करूनच कोणतेही कार्य केले जाते. तर वर्षातून दोनदा येथे मोठ्याप्रमाणात आदिवासी बांधव एकत्रित येत यात्रा भरवली जाते.
भुयारात असलेले सारस देवीच्या रूपात येथील भक्तांना आशीर्वाद देतात अशी आख्यायिका आहे. परंतु अतिशय खडदळ, कठीण ,शेतातून व डोंगरावरून खाली येणाऱ्या रस्त्याने पाणी, चांगला रस्ता, वीजपुरवठा नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डोंगरावरून खाली उतरल्यावर भुयारी सारजमाता देवस्थान पर्यंत जाण्यासाठी मोठमोठ्या दगडातून वाट काढत जावे लागत होते. येथे प्रा. डॉ. विठ्ठल आत्राम व त्यांच्या सहकारी यांच्या सहकाऱ्याने लोखंडी पायऱ्या तयार करून खाली उतरण्याची थोडशी वाट मोकळी केली आहे.
परंतु येथे मुख्य मार्गावरून पाणी पोहचविणे, कठडे बांधणे, रस्ता, पाण्याची टाकी, विद्युत पुरवठा आदी अडचणी असून त्यावर लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांना प्रत्यक्ष भेटून येथे मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या याकरिता देवस्थान समिती, नागरिक व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था निवेदन देणार आहेत.







