आदिलाबाद–माहूर–वाशिम–पोहरादेवी रेल्वे मार्गास मंजुरी मिळवून द्यावी : पालकमंत्री अतुल सावे यांना नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे निवेदन

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि .21 एप्रिल) :- आदिलाबाद–माहूर–वाशिम–पोहरादेवी या प्रस्तावित रेल्वे मार्गास मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

माहूर हे रेणुका माता व श्री दत्तप्रभूंचे पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच विदर्भातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरादेवी, त्यांच्या जोडीला उनकेश्वर येथील शरभंग ऋषींचा आश्रम व हेमाडपंथी मंदिरातील गरम पाण्याचे कुंड, तसेच वाशिम येथील बालाजी मंदिर ही प्रमुख धार्मिक स्थळे या प्रस्तावित रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे भाविकांच्या प्रवासासाठी मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या तब्बल २२ वर्षांपासून आदिलाबाद–माहूर–पुसद–वाशिम हा रेल्वे मार्ग प्रलंबित असून या परिसरातील आदिवासी, बंजारा तसेच इतर समाजघटकातील नागरिकांना अद्याप रेल्वे सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, या भागाच्या सर्वांगीण विकासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.दरम्यान, सन २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारतर्फे या प्रकल्पासाठी ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली होती. पुढे २०१६ मध्ये सुमारे २२५ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गाच्या अभियांत्रिकी व वाहतूक सर्वेक्षणास मंजुरी देऊन सुमारे २६४५.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे.

मात्र, इतक्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही या प्रकल्पाला अद्याप प्रत्यक्ष गती मिळालेली नसल्याने स्थानिक नागरिक, भाविक व विविध समाजघटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या रेल्वे मार्गास मंजुरी देऊन कामास गती द्यावी, अशी मागणी निवेदनातून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी काल दिनांक 17 रोजी माहूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्या कडे केली आहे.