दोन वेगवेगळे अपघात : चिमूरमध्ये दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी; शाळेचे मुख्याध्यापकही जखमी

✒️ गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.18 मार्च) :-

         चिमूरमध्ये एकाच दिवशी घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांनी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या अपघातात एका शाळेचे मुख्याध्यापक जखमी झाले आहेत.

        पहिला अपघात शहरातील नेहरू चौक येथे घडला. नगर परिषदेचा कचरा संकलन करणारा ट्रॅक्टर तेथे उभा होता. यावेळी एका भरधाव दुचाकीने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक प्रथमेश मनोहर मेश्राम (वय २४, नेताजी वार्ड, चिमूर) याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील इतर दोघे प्रशांत अभिमान शंभरकर (वय ३९) आणि उत्तम रंगराम रामटेके (वय ४०, दोघेही रा. कवडसी वार्ड, चिमूर) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तिघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्रथमेश यांना मृत घोषित केले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. याच दरम्यान प्रशांत शंभरकर यांचा उमरेडजवळ नागपूरला नेत असताना मृत्यू झाला, तर उत्तम रामटेके यांची प्रकृती गंभीर आहे.

      याच दिवशी दुसरा अपघात गदगाव–चिमूर मार्गावर घडला. येथे दुचाकीचा तोल गेल्याने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र उरकुडे हे जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रेमसिंह पठवा व गणेश वाघ करीत आहेत.