आंबोली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; विविध शासकीय योजनांचा लाभ

✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी)

 चिमूर(दि.18 मार्च) :-

महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी त्वरित सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १” अंतर्गत १४ मार्च २०२६ रोजी आंबोली येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे (चिमूर) होते, तर तहसीलदार श्रीधर राजमाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नागपूर विभागाचे आयुक्त यांचे प्रतिनिधी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार मटकर यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली.

शिबिरामध्ये नागरिकांना आधार कार्ड, संजय गांधी योजना प्रमाणपत्र, अधिवास, जात व उत्पन्न दाखले, रेशन कार्ड तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले. तसेच आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी, भूमी अभिलेख विभागाकडून सनद वाटप, तर कृषी विभागाकडून पीएम किसान लाभार्थींसाठी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याशिवाय पोलीस विभागामार्फत सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली.

अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी प्रशासन व जनतेतील दरी कमी करून शासकीय योजना आणि माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच चिमूर तालुक्यातील १० मंडळांमध्ये असे समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी विविध विभागांच्या योजनांची माहिती दिली. तर आंबोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वैभव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला आंबोली मंडळातील ग्रामपंचायतींचे प्रशासक, प्रतिष्ठित नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, चिमूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पंचभाई (मंडळ अधिकारी) यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप मुंडे (ग्राम महसूल अधिकारी) यांनी केले.