महागावात दोन दिवसीय भव्य बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न

🔹आयोजक सागर पाईकराव यांना मंगल कामना देताना भिकूसंघ

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.25 फेब्रुवारी) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, महागाव यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय भव्य बौद्ध धम्म परिषद महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उत्साहात पार पडली.२१ व २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या या धम्म परिषदेचा हजारो बौद्ध उपासक, उपासिका आणि आंबेडकर अनुयायांनी लाभ घेतला.

धम्म परिषदेची सुरुवात पंचशील ध्वजारोहण व विधिवत उद्घाटनाने झाली. पूज्य भन्ते भदंत कौंडण्य स्थविर (मोर्शी), पूज्य भदंत सुबोध (यवतमाळ) आणि भदंत अश्वजीत स्थविर (यवतमाळ) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. धम्म परिषदे दरम्यान आयोजकांना भिकूसंघाने शुभकामना प्रदान केल्या. 

  सकाळ व दुपारच्या सत्रात भिक्खू संघांनी धम्मदेशना देत उपस्थितांना बौद्ध धम्माचे तत्वज्ञान व जीवनमूल्ये समजावून सांगितली.

सायंकाळी आयोजित बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. “काळजावर कोरले नाव, भीमा कोरेगाव” फेम सुप्रसिद्ध गायक अजय दहाडे (संभाजीनगर), अंजली गडपायले (तेलंगणा), भाग्यश्री इंगळे (अकोला) आणि गायिका निशाताई धोंगडे (चंद्रपूर) यांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. विशेषतः निशाताई धोंगडे यांच्या गायनाने उपस्थितांवर वेगळी छाप पाडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर दुपारी धम्मदेशना सत्र झाले. सायंकाळी व्याख्यानमालेत आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार प्रिया नप्ते (कोल्हापूर), प्रा. डॉ. अनिल काळबांडे (उमरखेड) आणि प्रा. बाळासाहेब ओझलवार (उमरखेड) यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमानंतर बुद्ध व भीम गीतांचा महामुकाबला आयोजित करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक अशोक निकाळजे (मुंबई), भीमशाहीर मनोजराजा गोसावी (अमरावती), भीमेश भारती (नागपूर) आणि संविधान मनोहरे (अमरावती) यांनी दमदार सादरीकरण केले.समारोपीय कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे, अध्यक्ष साहेबराव कांबळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष नालंदा भरणे, तहसीलदार अभय मस्के यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच ठाणेदार धनराज निळे, प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, रविकुमार राजवाडे, डी. के. मुनेश्वर, मेश्राम, सरस्वती राठोड, अमोल राठोड, अ‍ॅड. अक्षय बनसोडे, सोनू शिंदे, माधवराव कांबळे आदींची उपस्थिती लाभली.मुख्य आयोजक सागरदादा पाईकराव, मार्गदर्शक प्रा. शरदचंद्र डोंगरे यांच्यासह मोठ्या कार्यकर्त्यांच्या टीमने परिषदेचे नियोजन केले. या भव्य धम्म परिषदेने महागावात सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक वातावरण निर्माण करत बौद्ध धम्माचा संदेश जनमानसात पोहोचवला.