आदिवासी समुदायाच्या परंपरा व धार्मिक श्रद्धेनुसार स्वतंत्र दफनभूमी द्या….अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली

 🔹आदिवासी विकास मंत्र्यांकडे मागणी

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि .13 जानेवारी) :- आदिवासींच्या परंपरा व धार्मिक श्रध्दानुसार स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीच्या वतीने आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे जीवनमान, संस्कृती, श्रद्धा व परंपरा या स्वतंत्र, ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. मृत्यू पश्चात अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आदिवासी समाजात इतर समाजांपेक्षा वेगळी आहे.

आमच्या समाजात मृतांना दहन करण्याची परंपरा नाही, तर त्यांना दफन करण्याची परंपरा आहे. ही प्रथा आदिवासी समुदायात हजारो वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती आपल्या धार्मिक श्रद्धेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा एक भाग आहे.

तरी, सध्याच्या परिस्थितीत अनेक ठिकाणी एक सामान्य स्मशानभूमी वापरावी लागते, जी बहुतेकदा अंत्यसंस्कारासाठी राखीव असते. अशा ठिकाणी दफनविधी करणे अत्यंत कठीण आणि समस्याप्रधान बनत जात आहे. यामुळे कुठेतरी धार्मिक भावना दुखावतात आणि अनेकदा स्थानिक पातळीवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत असते.

नवीन वसाहती, पुनर्वसन क्षेत्रे आणि सरकारी विकास योजनांमध्ये स्वतंत्र दफनभूमीचा विचार केला जात नाही.

म्हणूनच, आदिवासी समुदायाच्या चालीरीती, परंपरा आणि धार्मिक भावनांचा आदर करून आदिवासी समाजासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र दफनभूमी उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोली आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना निवेदन सादर करत करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा प्रदेश सचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, साहित्यिक कुसुमताई अलाम अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, मिडिया जिल्हाप्रमुख रुपेश सलामे,शहर महासचिव गौरव सिडाम, शहर सोशल मिडिया प्रमुख श्रेयश पडोती यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.