प्रभाग 12 मधील सीसी रोडचे काम दर्जाहीन ; सा. बां.विभागाकडे तक्रार

🔸महागावातील रोड घोटाळ्यावर नगरसेवकांचा थेट आरोप

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव (दि.14 जानेवारी) :- 

महागाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. १२ मधील सीसीरोड (संजय कदम ते ससाने यांचे घरा पर्यंत) या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे अंदाजपत्रकाला डावलून सुरू असल्याचा आरोप नगरसेविका जयश्री संजय नरवाडे यांनी केला आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, महागाव कार्यालयाकडे 13 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. 

महागाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील हा सिमेंट काँक्रेट रस्त्यावरून या भागातील विद्यार्थ्यांना शाळेतून येजा करण्यासाठी तसेच या ठिकाणाहून वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतांना सदर सिमेंट काँक्रीट रोड कामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला. नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करीत सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाकडे तशा आशयाची मंगळवारी तक्रार दाखल केली. सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्राकलनानुसार आवश्यक ते बांधकाम साहित्य न वापरता वापरण्यात येणारे मटेरियल निकृष्ट व अत्यल्प वापरल्याने कामाचा दर्जा प्रचंड ढासळला आहे. संबंधित कामाचा ठेका दुसऱ्याच एका डमी ठेकेदारामार्फत चालू असल्याचा आरोप करण्यात आला.

काम आतुरमातुर पद्धतीने करून बिले लाटल्या जात असून जनतेच्या सुविधेसाठी असलेला निधी ठेकेदाराच्या घशात जात असल्याची तक्रार करण्यात आली. कामाचे टेंडर ज्या ठेकेदाराने घेतले तो ठेकेदार कदापी चालू असलेल्या या कामावर आलाच नसून होऊ घातलेले काम करणारा डमी ठेकेदार, संबंधित विभागाचे उपअभियंता संगणमताने कामात प्रचंड गैरप्रकार करीत असल्याने होऊ घातलेले काम तात्काळ थांबून गुण नियंत्रण विभागामार्फत सदर कामाची चौकशी होऊन निकृष्ट, दर्जाहीन काम करणाऱ्या अशा ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची मागणी नगरसेविकास जयश्री संजय नरवाडे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 सदर कामाची तक्रार करूनही 

अंदाजपत्रकानुसार काम होत नसून चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर काम तात्काळ थांबविण्यात यावे,असेही तक्रारीतून नमूद केले आहे.

जर प्रशासनाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, तर नगरसेवक व प्रभागातील नागरिकांच्या वतीने रस्तारोको आंदोलन, आमरण उपोषण करण्यात येईल,असा गर्भित इशाराही यावेळी नगरसेविकांनी दिला आहे.

या सर्व प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ठेकेदारांच्या फायद्यासाठी जनतेच्या सुरक्षेशी तडजोड तर होत नाही ना?असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.