✒️गुणवंता चटपकार चिमूर(Chimur प्रतिनिधी)
चिमूर(दि.31 डिसेंबर) :-
नायलॉन मांजामुळे दरवर्षी निष्पाप नागरिकांचे प्राण जात असताना, बेदरकार वापरकर्ते व लालची विक्रेते अजूनही मोकाट असल्याने मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी थेट इशार्याचा फटका दिला आहे. दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी पारित आदेशान्वये नायलॉन मांजाच्या वापर व विक्रीविरोधात नगर पालिका चिमूर कडून निर्दय कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
सन 2021 पासून बंदी असतानाही शहर-गावात नायलॉन मांजाचा खुलेआम बाजार सुरू आहे. दुचाकीस्वारांचे गळे चिरले जात आहेत, लहान मुले जखमी होत आहेत, पक्षी व प्राणी अक्षरशः फासावर लटकत मरत आहेत—तरीही जबाबदार यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. न्यायालयाने ही स्थिती मानवी जीवनाशी खेळ असल्याचे ठामपणे नमूद केले आहे. मा. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “पतंग उडवणे हा खेळ आहे; पण नायलॉन मांजा हे हत्यार आहे.” त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर करणारे आणि विक्री करणारे दोघेही मृत्यूंसाठी थेट जबाबदार ठरणार आहेत. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना शेवटची संधी देण्यात येणार असून, त्यानंतर कडक आर्थिक फटका बसणार आहे.
अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास
पालकांना रु. 50,000/- दंड प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजाने पतंग उडवताना पकडली गेल्यास थेट रु. 50,000/- दंड — कोणतीही दया नाही. नायलॉन मांजाचा साठा विक्रीसाठी आढळल्यास विक्रेत्याला प्रत्येक उल्लंघनासाठी रु. 2,50,000/- दंड — दुकान सील होण्याचीही शक्यता आहे. नायलॉन मांजा हा बेकायदेशीरच नव्हे तर जीवघेणा प्रकार असून, यापुढे कुणीही “माहित नव्हते” अशी सबब सांगू शकणार नाही. नियम मोडणाऱ्यांना थेट न्यायालयाचा कोप सहन करावा लागेल. चिमूर नगर पालिका प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, नायलॉन मांजाशी संबंध ठेवणाऱ्यांना आता वाचवणारा कुणीच उरणार नाही. पतंग उडवा, पण माणसांचे प्राण घेऊन नाही—असा कडक संदेश देण्यात आला आहे.







