🔹दारूला नकार, भविष्याला आकार; दारू नको, भविष्य हवं!
🔸दारू न पिता नववर्षाचे स्वागत करा – नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचे आवाहन
✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली (दि.31 डिसेंबर) :-
नववर्षाच्या स्वागताला सामाजिक बांधिलकीची जोड देत मुक्तीपथ जिल्हा दारूमुक्त अभियान व निर्माण युवा चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (31 डिसेंबर) गडचिरोली शहरात प्रभावी व आक्रमक जनजागृती रॅली काढण्यात आली. दारू न पिता नववर्षाचे स्वागत करणे व ‘दारूमुक्त गडचिरोली शहर’ घडवण्याचा निर्धार या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला.
या रॅलीत शहरातील मोठ्या संख्येने युवक-युवती, पुरुष व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “दारू नको – भविष्य हवं”, “दारूमुक्त गडचिरोली, समृद्ध गडचिरोली” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारूऐवजी सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“गडचिरोली जिल्हा अधिकृतरीत्या दारूबंदी असतानाही अवैध व मिलावट दारूचा काळा व्यवसाय सुरू आहे. या दारूमुळे अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले असून असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. दारूने कित्येक संसार रस्त्यावर आणले आहेत. हे थांबवण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. गडचिरोली शहर दारूमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.”
दारूमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबे, भरकटत चाललेली तरुण पिढी व वाढती सामाजिक अराजकता याविरोधातील हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. नववर्षाच्या सुरुवातीलाच दारूविरोधात असा ठोस संदेश देत गडचिरोलीतील युवकांनी संपूर्ण जिल्ह्यासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
ही रॅली म्हणजे केवळ नववर्षाचे स्वागत नसून, दारूमुक्त गडचिरोलीसाठी सुरू झालेल्या सामाजिक क्रांतीचा एल्गार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.
यावेळी डॉ. अमृत बंग, विलास निंबोरकर, सावदकर साहेब (संचालक, मुक्तीपथ), विठ्ठलराव कोटारी, किशोर खोब्रागडे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







