🔸निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करून विष्णुपुरी धर्तीवर बंधारे उभारण्याची ठाम मागणी
✒️ यवतमाळ (Yavatamal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.22 डिसेंबर) :-
यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक नागरिकांच्या अस्तित्वावर गदा आणणाऱ्या निम्न पैनगंगा धरण प्रकल्पाविरोधात धरण विरोधी संघर्ष समिती आणि राष्ट्रीय किसान मोर्चा संयुक्तपणे तीव्र लढा उभारणार असल्याचा ठाम निर्णय सावळी सादोबा येथे झालेल्या निर्णायक बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर हा प्रकल्प पूर्णतः रद्द करून त्या ठिकाणी विष्णुपुरी धर्तीवर बंधारे (बॅराज) उभारण्यात यावेत, अशी पर्यायी आणि स्पष्ट मागणी मांडण्यात आली.
ही महत्त्वपूर्ण बैठक साई मंगल कार्यालय, सावळी सादोबा येथे मोठ्या उपस्थितीत पार पडली.
प्रकल्पाचा तपशील व आक्षेप
बैठकीचे प्रास्ताविक मा. ॲड. बालाजी येरावार यांनी केले. त्यानंतर धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष मा. प्रल्हाद पाटील जगताप यांनी प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता, प्रचंड खर्च, पाणीसाठ्याचे स्वरूप तसेच ग्रामसभेचा ठराव न घेता सुरू करण्यात आलेल्या कामाचा सविस्तर आढावा मांडला.
भीषण सामाजिक परिणाम
बैठकीत पुढील गंभीर बाबी स्पष्ट करण्यात आल्या—
यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील 95 गावे पाण्याखाली जाणार त्यापैकी 45 गावे पेसा क्षेत्रातील सुमारे 50 हजार एकर सुपीक शेती बुडीत जवळपास दीड लाख नागरिकांचे विस्थापन
इतक्या मोठ्या सामाजिक-आर्थिक हानीनंतरही शेतकऱ्यांना कोणताही थेट लाभ होणार नसल्याचा संताप यावेळी व्यक्त झाला.
पेसा कायद्याचे उल्लंघन
यवतमाळ जिल्हा आदिवासीबहुल व पेसा कायद्याच्या कक्षेत येत असताना, आदिवासी ग्रामसभेचा ठराव न घेता व शेतकऱ्यांशी चर्चा न करता प्रकल्प राबवणे हे घोर कायदेभंग असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे “देशात लोकशाही आहे की हुकूमशाही?” असा सवाल उपस्थित झाला.
आंदोलनाची दिशा व कायदेशीर लढा
या बैठकीत मा. शिवलिंग चौधरी (राज्य कार्यकारिणी सदस्य),
मा. दिपक इंगळे पाटील (प्रदेश अध्यक्ष – महाराष्ट्र),
मा. बालाजी कांबळे (प्रदेश प्रभारी – महाराष्ट्र)
यांनी संयुक्त आंदोलनाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि पुढील रणनीती स्पष्ट केली.
तसेच मा. ॲड. सुनिल डोंगरदिवे (मुंबई उच्च न्यायालय) यांनी न्यायालयीन लढ्याचे पर्याय, कायदेशीर प्रक्रिया आणि प्रशासनाशी संघर्ष कसा करायचा यावर मार्गदर्शन केले.
उपस्थिती व आयोजन
यावेळी प्रल्हाद गावंडे कोषाध्यक्ष,मुबारक तंवर प्रसिद्धी प्रमूख, विजय राऊत सामिती सदस्य यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल गवई, भारतीय बेरोजगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष प्रशांत मुनेश्वर, रामपाल मडावी, संजीव कानिंदे राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष, सम्यक मुनेश्वर राष्ट्रीय किसान मोर्चा किनवट तालुकाध्यक्ष , अविनाश ढवळे राज्य प्रचारक राष्ट्रिय किसान मोर्चा, शेषराव मुनेश्वर, चंदन बाराहाते, मधुकर हटकरे, नरेंद्र खरतडे, संतोष भगत, नितिन कुमरे, गजनान डाखोरे, मोहन चव्हान, मोहन कुमरे, साहेबराव पुनवटकर, आनंदा जगताप, देवराव गावंडे, आनंदराव गावंडे, रामराव गायकवाड, अमोल सोनटक्के, उत्तम मीरासे, उत्तम भेंडे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीचे संपूर्ण आयोजन भुवन मुनेश्वर (राष्ट्रीय किसान मोर्चा प्रचारक, यवतमाळ जिल्हा) यांनी केले.
पर्यायी विकासाचा प्रस्ताव
धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय किसान मोर्चाला हा लढा कायदेशीर, प्रशासकीय व रस्त्यावर उतरून संयुक्तपणे लढण्याची लिखित मागणी देण्यात आली. मोठ्या धरणाऐवजी विष्णुपुरी धर्तीचे बंधारे उभारल्यास कमी विस्थापन होईल, शेतीला पाणी मिळेल आणि पर्यावरणाची हानी टळेल, असा ठाम निष्कर्ष मांडण्यात आला.
बैठकीसाठी साई मंगल कार्यालय तंवर परिवाराने विनामोबदला उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रीय किसान मोर्चाने त्यांचे आभार मानले
निष्कर्ष
हा संघर्ष केवळ धरणाविरोधातील नसून शेतकरी, आदिवासी व ग्रामीण समाजाच्या अस्तित्वाचा लढा आहे.
निम्न पैनगंगा धरण प्रकल्प रद्द करून विष्णुपुरी धर्तीवर बंधारे बांधण्यात यावेत, हीच एकमुखी मागणी या बैठकीतून पुढे आली.
निम्न पैनगंगा धरण प्रकल्प रद्द झालाच पाहिजे







